पुणे: प्रियकराच्या साथीने वडिलांचा खून, आईसह तिघांविरुद्ध गुन्हा; पाच दिवसांत गुन्ह्याचा छडा

पुणे: प्रियकराच्या साथीने वडिलांचा खून, आईसह तिघांविरुद्ध गुन्हा; पाच दिवसांत गुन्ह्याचा छडा
Published on
Updated on

पुणे/तळेगाव ढमढेरे : आईसोबत वाद आणि आपल्या प्रेमसंबंधांना विरोध करणार्‍या वडिलांचा प्रियकर आणि आईच्या साथीने अल्पवयीन मुलीने क्राईम वेब सीरिज पाहून कट रचून खून केला. त्यानंतर पुणे-नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरात मृतदेह पेट्रोल टाकून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेजाळून टाकला.

कोणताही पुरावा नसताना केवळ सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून शिक्रापूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच दिवसांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना गजाआड केले. जॉन्सन कॅजिटन लोबो (वय 49, गुडविल, वृंदावन आनंद पार्क, वडगाव शेरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते एका खासगी कंपनीत काम करीत होते. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय 43), मुलीचा प्रियकर अ‍ॅग्नेल जॉय कसबे (वय 23, रा. साईकृपा सोसायटी, वडगाव शेरी) या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर मुलीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मृत जॉन्सन यांच्या 17 वर्षीय मुलीचे अ‍ॅग्नेल कसबे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तसेच जॉन्सन हा तिच्या आईसोबत देखील सतत वाद घालत असे. जॉन्सनचा अ‍ॅग्नेल व मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध होता. त्यातून त्यांचा अनेकदा वाद होत होता. त्यामुळे तिघांनी मिळून जॉन्सन यांचा काटा काढण्याचा कट रचला. 30 मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात डोक्यात वरंवटा मारून मानेवर चाकूने वार केले. त्यामध्ये जॉन्सन याचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी (31 मे) रात्रीपर्यंत त्यांनी मृतदेह तसाच घरात ठेवला. त्यानंतर अंधार झाल्यानंतर जॉन्सन याचा मृतदेह चारचाकी गाडीत घालून पुणे-नगर रस्त्यावरील सणसवाडीजवळील एका पेट्रोल पंपाच्या अलीकडे नाल्यात टाकून पेट्रोल ओतून पेटवून दिला.

घरातून मृतदेह बाहेर काढता तो सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतरे, उपनिरीक्षक अमोल खटावकर, गणेश जगदाळे, अभिजित सावंत, कर्मचारी जितेंद्र पानसरे, किशोर शिवणकर, अमोल दांडगे, निखिल रावडे, विकास पाटील, शिवाजी चितारे, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, राजू मोमीन यांनी केली.

सीसीटीव्हीतील कार अन् गुन्ह्याचा छडा

घटनेच्या दुसर्‍या दिवशी (1 जून) सकाळी साडेसात वाजता शिक्रापूर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, येथील नाल्यात एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत पडलेला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृदेहाच्या अवस्थेवरून त्याची ओळख पटविणे अवघड होते. पोलिसांनी तब्बल चार दिवस अन् चार रात्री जागून 230 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्या वेळी एका वॅगनआर गाडीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ती गाडी वडगाव शेरी येथील असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी अ‍ॅग्नेलचा पत्ता शोधून काढला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news