पुणे: कागदपत्रांची पडताळणी रुग्णालयेच करणार, ‘शहरी गरीब’योजनेबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाचा निर्णय | पुढारी

पुणे: कागदपत्रांची पडताळणी रुग्णालयेच करणार, ‘शहरी गरीब’योजनेबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाचा निर्णय

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरी गरीब योजनेचा जिल्ह्याबाहेरील रुग्णांना बनावट कागदपत्रांद्वारे लाभ मिळवून देणार्‍या एजंटांची टोळी कार्यरत असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आरोग्य विभागाने कागदपत्र पडताळणी करण्याची जबाबदारी रुग्णालयांवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. जी रुग्णालये याबाबत कार्यवाही करणार नाहीत, त्यांची बिले मंजूर केली जाणार नाहीत, असा इशाराही आरोग्य विभागाने दिला आहे.

शहरी गरीब योजनेतील बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. रुग्णाचे नाव, पत्ता, ओळखपत्र, दाखल वॉर्ड क्रमांक, आयपीडी क्रमांक अशा माहितीची नोंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. रुग्णाचे रेशनकार्ड आणि आधार कार्ड खोटे असल्याचे निदर्शनास आल्यास बिले मंजूर केली जाणार नाहीत, असा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या हद्दीबाहेरील रुग्ण बरेच दिवस शहरातील रुग्णालयात दाखल असल्यास आणि वैद्यकीय खर्च वाढल्यावर ‘शहरी गरीब’चा लाभ घेण्यासाठी बोगस रेशनकार्ड, आधारकार्ड, उत्पन्नाचे दाखले तयार करून घेतात. बोगस कागदपत्रे संगणकीकृत करून महापालिकेकडे मान्यतेसाठी पाठवली जातात. शहरातील दोन खासगी रुग्णालयांनी अशी प्रकरणे निदर्शनास आणून दिल्यावर संबंधित रुग्णांना शहरी गरीब योजनेचा लाभ नाकारण्यात आला आहे. शहरी गरीब योजनेंतर्गत शहरातील 143 रुग्णालये नोंदणीकृत आहेत. संबंधित रुग्णालयांनी रुग्णाच्या नातेवाइकांना ‘एस्टिमेट’चे पत्र देताना संबंधित रुग्णाचे नाव, पत्ता, ओळखपत्र, वॉर्ड क्रमांक आणि बेड क्रमांक, आयपीडी क्रमांक यांची प्राधान्याने नोंद ठेवावी. बिलिंग विभागातील जबाबदार व्यक्तीने कागदपत्रांची पडताळणी करूनच पत्र द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. रेशनकार्ड आणि आधार कार्डवरील नाव, पत्ता अचूक आणि एकच असल्याची बारकाईने खात्री करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णांची वैद्यकीय बिले शहरी गरीब योजनेंतर्गत मंजूर व्हावीत, यासाठी रुग्णांकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत दोन खासगी रुग्णालयांनी बोगस प्रकरणे आमच्याकडे फेरजमा केली आहेत. बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी रुग्णालयांना संबंधित रुग्णांच्या सर्व माहितीची नोंद ठेवण्याचे आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

– डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

हेही वाचा:

Stock Market Closing | RBI च्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स ३५० अंकांनी वाढून ६३,१४२ वर बंद

Kolhapur Bandh : कोल्हापुरात तणावाचे वातावरण; पालकमंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा

 

Back to top button