पुणे: दररोज एक कोटी लिटर पाण्याची बचत, मीटरमुळे पाणीगळती शोधण्यात यश | पुढारी

पुणे: दररोज एक कोटी लिटर पाण्याची बचत, मीटरमुळे पाणीगळती शोधण्यात यश

पुणे, पुढारी वृत्तसेवा: घरोघरी पाणी मीटर बसविल्यामुळे प्रतिदिन होणारी पाण्याची एक कोटी लिटर गळती शोधण्यात महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे शहरातील उर्वरित मीटर बसविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

महापालिकेने शहरातील नागरिकांना समान पाणी देण्यासाठी आणि पाणीगळती थांबविण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. या योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्यांची उभारणी, पाईपलाईन आणि घरोघरी मीटर बसविण्याचे काम हाती घेतले आहे. या योजनेचे 60 टक्क्यांहून अधिक काम झाले असून, ज्या ठिकाणी पाईपलाईनचे काम झाले आहे, तेथे पाणी मीटर बसविण्यात येत आहेत. मीटर बसविण्याचा मूळ उद्देश पाण्याचे ऑडिट करणे हा आहे. आतापर्यंत बसविण्यात आलेल्या मीटरमुळे चोरी, लीकेज व अन्य कारणास्तव दररोज एक कोटी लिटर पाण्याचा हिशेब लागत नसल्याचे उघडकीस आले आहे. यामुळेच कोरोनाकाळात मंदगतीने सुरू असलेल्या मीटर बसविण्याच्या कामाला वेग देण्यात येणार आहे. प्रामुख्याने शहराच्या उपनगरांमध्ये या कामाला गती देण्यात येत आहे. लवकरच शहराच्या मध्यभागातही मीटर बसविण्याचे काम केले जाणार आहे. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन विक्रम कुमार यांनी केले.

पर्वती येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र

शहरात लष्कर पाणीपुरवठा केंद्रातील जलशुद्धीकरण केंद्र हे 135 वर्षे जुने आहे. त्यानंतर पर्वती येथील जलशुद्धीकरण केंद्र हे जुने मानले जाते. या केंद्राला साधारणत: पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत. या केंद्रात दररोज 535 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. येथे शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याचा प्रामुख्याने पुणे शहर, एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. या केंद्रातील जुन्या केंद्राजवळ नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभाण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वाशे कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या कामाचा आराखडा तयार झाला असून, एस्टीमेट कमिटीसमोर तो मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा:

पुणे: प्रियकराच्या साथीने वडिलांचा खून, आईसह तिघांविरुद्ध गुन्हा; पाच दिवसांत गुन्ह्याचा छडा

पुणे: विद्यापीठाचे मानांकन घसरण्यास राजकीय तडजोडी कारणीभूत, शिक्षणतज्ज्ञांचे मत

पुणे: जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका घटनेनुसारच, देवस्थान अध्यक्षांचा दावा

 

Back to top button