corona crime : कोरोना प्रकोपातही देशातील गुन्हेगारीत 28 टक्के वाढ!

file photo
file photo
Published on
Updated on

गेल्यावर्षी देशभर कोरोनाचा प्रकोप सुरू असताना आणि जवळपास सहा महिने लॉकडाऊन असतानाही गुन्हेगारीत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुन्हेगारीतील लहान मुलांचा सहभाग चिंताजनक असून, मुली-महिलांविषयक गुन्हेगारीनेही उचल खाल्ल्याचे दिसत आहे. 'नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्यूरो'च्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. (corona crime)

corona crime : 66 लाखांवर गुन्हे!

देशात 2020 मध्ये एकूण 66 लाख 1 हजार 285 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली असून, 2019 च्या तुलनेत ही वाढ 28 टक्के इतकी आहे. प्रतिलाख लोकसंख्येमागे 385 वरून 487 पर्यंत गुन्ह्यांची वाढ झालेली दिसत आहे. 64.4 टक्के गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे तर लॉकडाऊनच्या कालावधीत शासकीय आदेशाचा भंग केल्याबद्दलचे सहा लाखांहून अधिक गुन्हे नोंद आहेत.

खून आणि अपहरण!

2020 मध्ये देशभरात खुनाच्या 29 हजार 193 घटना घडल्या असून, त्यापैकी 10 हजार 404 घटना सामूहिक वादविवादातून झाल्या आहेत. वैयक्तिक वादविवाद किंवा पूर्ववैमनस्यातून घडलेल्या खुनांच्या घटनांचे प्रमाणही (4,034 खून) लक्षणीय आहे. गेल्यावर्षी अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यांची संख्या 88 हजार 590 इतकी आहे. अपहृतांमध्ये 56 हजार 591 अल्पवयीनांचा आणि 31 हजार 999 प्रौढांचा समावेश आहे. अपहृतांमध्ये 47,876 मुली आणि 25,845 महिला आहेत. अपहृतांपैकी 83.21 टक्के मुली आणि महिला आहेत.

कौटुंबिक हिंसा चिंताजनक!

सन 2020 मध्ये एकूण 3 लाख 71 हजार 503 महिलांविषयक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 30 टक्के गुन्हे हे कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकारातील, तर 23 टक्के गुन्हे हे विनयभंगाचे
आहेत.

काळवंडलेले बालविश्व!

देशात 2020 मध्ये 1 लाख 28 हजार 531 बालविषयक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये खंडणी आणि अपहरणविषयक 42 टक्क्यांहून अधिक गुन्हे आहेत. यावरून खंडणी उकळण्यासाठी प्रामुख्याने बालकांचा वापर होत असल्याची बाब स्पष्टपणे पुढे आली आहे. याशिवाय 38.8 टक्के बालके विविध प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडली आहेत.

देशातील बालगुन्हेगारीही चिंताजनक पातळीवर असल्याचे जाणवते. बालगुन्हेगारांविरुद्ध एकूण 29 हजार 768 गुन्ह्यांची नोेंद झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, ज्या बालगुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यापैकी 26 हजार 954 (76.2 टक्के) बालगुन्हेगार हे 16 ते 18 वयोगटातील आहेत.

देशात ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये कोरोना काळात 10.8 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी अनुसूचित जाती-जमाती अत्याचारांमध्ये 9.4 टक्क्यांनी भर पडल्याचे स्पष्ट होत आहे.आर्थिक स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्येही 12 टक्क्यांनी घट झाली आहे. लाचखोरीमध्ये गेल्यावर्षी जवळपास 27 टक्क्यांनी घट होऊन देशभरात 3,100 गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोना काळात देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. 44 हजारांवरून सायबर गुन्ह्यांचा आकडा 50 हजारांवर गेला आहे. (समाप्त)

एवढे सापडले, काहींचा थांग ना पत्ता!!

2020 साली देशभरातून एकूण 3 लाख 23 हजार 170 व्यक्ती (1,00,748 पुरुष, 2,22,395 महिला) बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. तसेच याच सालात 3 लाख 32 हजार 483 बेपत्ता व्यक्ती मिळून आल्याच्याही नोंदी आहेत. हरवलेल्या आणि शोध लागलेल्या व्यक्तींमध्ये लहान मुले-मुली आणि महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हरवलेल्यांपेक्षा शोध लागलेल्यांची संख्या जादा दिसत असली, तरी त्यामध्ये पूर्वी हरवलेल्या आणि आता सापडलेल्या व्यक्तींचाही समावेश असल्यामुळे ही तफावत आढळून येत आहे.

बनावट नोटांचा सुळसुळाट!

2019 साली 25 कोटींवर रकमेच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. मात्र, कोरोना काळात यामध्ये जवळपास चौपटीने वाढ झाली आहे. 2020 साली एकूण 92 कोटी 17 लाख 80 हजार 480 रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या आहेत. 2019 मध्ये 2.87 लाख बनावट नोटा सापडल्या होत्या, तर 2020 साली तब्बल 8 लाखांवर बनावट नोटा मिळून आल्या आहेत. लॉकडाऊन, बेरोजगारी, महागाई आदी कारणांमुळे अनेक गुन्हेगार नव्याने बनावट नोटांच्या व्यवसायात उतरल्याचा अंदाज पोलिस अधिकार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news