पौड रोड : शिवरायांच्या कार्याच्या प्रसारासाठी उपक्रम : पालकमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

पौड रोड : शिवरायांच्या कार्याच्या प्रसारासाठी उपक्रम : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पौड रोड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ’छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारतर्फे जिल्ह्यांच्या स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच, ठिकठिकाणी शिवरायांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत,’ अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पौड रोड परिसरातील काकडे फार्म येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्व संध्येला (सोमवारी) आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कोथरूड व्यासपीठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे शहर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कोथरूड व्यासपीठाचे अध्यक्ष शाम देशपांडे, जय काकडे आदी या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ’संत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण युवकांनी अंगीकारावेत. तसेच त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवेत.’ वंजारवाडकर म्हणाले, ’शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पाहण्याची उत्सुकता सर्वांना आहे. शहरात विविध ठिकाणी यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.’ देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ’जाणता राजा’च्या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.

Back to top button