सांगवीतील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

सांगवीतील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर

नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुनी सांगवी येथील कृष्ण मंदिरासमोर पवना नदीकाठी गुरुवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून चारचाकी वाहनावर पडले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

धोकादायक झाडांच्या फांद्या तोडा

पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकातील उद्यानाच्या सीमाभिंतीला लागून महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेले बदामाचे झाड मुसळधार पावसामुळे उन्मळून पडले. याकडेही उद्यान विभाग दुर्लक्ष करीत आहे. या झाडाचे पुनर्वसन अथवा पुनर्रोपन केल्यास जीवदान मिळू शकते, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. एरवी नागरिकांना झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, गुरुवारी उन्मळून पडलेली झाडे उचलून नेण्यास उद्यान विभाग अपयशी ठरत आहे. आता या उद्यान विभागाला कुणी विचारणार आहे की नाही? असा सवाल येथील नागरिकांकडून होत आहे. तसेच, परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी केली जात आहे.

रस्त्यावर पडलेली झाडे हटवा

परिसरातील झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच, वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यावर पडलेले झाडे हटविण्याची मागणी केली
जात आहे.

उद्यान विभागाचे दुर्लक्ष

महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्व सर्व कामे केल्याचा दावा करत असते. या वर्षीही महापालिकेने कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. अजून तर पावसाळा सुरू झाला नाही. मात्र, दोन दिवस उलटूनही उद्यान विभाग येथील वाहनावर पडलेले झाड काढण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

पिंपरी शहरात लोकसंख्यानिहाय हवीत 69 लाख झाडे

भारतातील टॉप १० विद्यापीठांच्या यादीत आयएससी बेंगळुरू विद्यापीठ पहिले; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून यादी जाहीर

Uttar Pradesh | अवधेश राय हत्याप्रकरणी गँगस्टर मुख्तार अन्सारी दोषी

Back to top button