

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यावरून काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेसुध्दा सध्या सावध पवित्रा घेतला आहे. सोमवारी (दि. 5) पुण्यात शिरूरसह विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेणार असून, त्यात पुणे लोकसभा मतदारसंघाची मात्र बैठक बोलाविण्यात आलेली नाही.
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागणार की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.
त्यातच पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचे सांगत या जागेची मागणी केली होती. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अशीच री ओढली. राष्ट्रवादीच्या या पवित्र्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत ही जागा सोडणार नसल्याचे ठणकावले. शनिवारी मुंबईत काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघाची आढावा घेत बैठक घेतली. त्यात पुण्यातील सर्वच पदाधिकार्यांनी ही जागा राष्ट्रवादीला सोडू नये, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीने सध्या एक पाऊल मागे घेतले असल्याचे दिसते. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात काही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील काही प्रमुख मतदारसंघांचा समावेश आहे. गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारसंघांच्या आढावा बैठका होणार आहेत.
या बैठकांना संबंधित लोकसभा मतदारसंघातील आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांना निमत्रित करण्यात आले आहे. मात्र, पुण्यात या बैठका होत असताना पुणे लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलाविण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीने सध्या सावध पवित्रा घेतल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभेची पोटनिवडणूक लागली, तरच याबाबत हालचाली होतील; अन्यथा ही चर्चा थांबण्याची शक्यता आहे.
हेही वाचा