पुणे : आदिवासी तरुणाच्या नावावर उचलले 1 कोटी 10 लाखांचे कर्ज | पुढारी

पुणे : आदिवासी तरुणाच्या नावावर उचलले 1 कोटी 10 लाखांचे कर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यातील रामपूर खेडपाडा येथील अमृत पडवळे या तरुणाच्या नावे एक कोटी दहा लाखांचे बनावट कर्ज काढून तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच, आदिवासी समाजाची जमीन बेकायदेशीरपणे खरेदी करणार्‍या आरोपींना आठ दिवसांत अटक करून कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

डॉ. पाटणकर म्हणाले की, अमृत केशव पडवळे हा आदिवासी तरुण बाणेर येथील ऑर्चिड स्कूलमध्ये नोकरीस होता. त्या वेळी संचालक अमर जाधव यांनी अमृत पडवळे याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याची व आदिवासी समाजाची फसवणूक केली आहे. नोकरीला लावतो, महिना 25 हजार देतो, असे आमिष दाखवून अमृत याच्या नावावर ठाणे जिल्ह्यातील व परिसरातील आदिवासी समाजाची जमीन खरेदीखत करून घेतली. तसेच, त्यानंतर त्याच्या परस्पर अमृतच्या नावे जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी सोलापूर येथील बँकेतून बनावट कागदपत्रे व सह्या वापरून एक कोटी दहा लाख रुपयांचे कर्ज काढले तसेच अमर जाधव व यशवंत पाटील यांनी स्वत:कडे घेतले.

आदिवासी तरुणाला जाळ्यात अडकवून त्यामार्गे अनेक गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आदिवासी समाजाची जमीन खरेदी करता येत नसल्याने या तरुणाला आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार लक्षात येताच सोलापूर येथील सदरबाजार पोलिस ठाण्यात अमृत पडवळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, गुन्हा दाखल होऊनही इतक्या दिवसांत आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. या गंभीर प्रकरणाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, या मागणीसाठी त्यांना निवेदन दिले जाणार आहे, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

हेही वाचा 

पुणे : आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज; 500 जणांना आपत्तीनिवारणाचे प्रशिक्षण

जुळ्या बहिणींची अजब कहाणी ! प्राथमिक शाळेपासून ते दहावीपर्यंत समानच गुण

नाशिक : मेतकर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Back to top button