

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आणि हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना दिल्या आहेत. जिल्ह्यात 500 पेक्षा जास्त आपत्तीमित्रांना आपत्तीनिवारणाचे प्रशिक्षण देण्यात आले असून, तालुका मुख्यालयात असलेले साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली जात आहे.
जिल्ह्यात एकूण 11 नद्या वाहत असून, 80 पेक्षा जास्त पूरप्रवण, तर 23 गावांना दरडींचा धोका आहे. यंदा एल-निनोचा अंदाज असला, तरी गतवर्षी पर्जन्यछायेतील तालुक्यात एका दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या बाबींचा विचार करून आपत्तीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करून सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व विभागप्रमुखांना केल्या आहेत.
पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगरपरिषदा, पीएमआरडीए, आरोग्य विभाग, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण पोलिस, एनडीआरएफ, प्रांताधिकारी, तहसीलदार, परिवहन विभाग आदी विभागांना मान्सूनपूर्व तयारी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे येणार्या आपत्तीवर मात करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक साहित्य पुरविण्यात आले. तसेच जे साहित्य पूर्वीचे आहे, ते सुस्थितीत असल्याची खातरजमा केली जात आहे. ज्या तालुक्यांना पुराचा आणि अतिवृष्टीचा धोका आहे, अशा तालुक्यांना रबर बोट 17, इंजिन 17, लाइफ जॅकेट 90, लाइफ बॉय 80, विविध प्रकारचे दोर 39, सर्च लाइट 28, सॅटेलाइट फोन 10 आणि रिफ्लेक्टर जॅकेट 50 आहेत.
आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेली जेसीबी, पोक्लेन आदी यंत्रसामग्री गतीने उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांची यादी करून परिवहन विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मोठ्या पावसामुळे रस्ते तुंबतात, त्यामुळे पावसाळी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करा, अशा सूचनाही जिल्हाधिकार्यांनी केल्या आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह शहरांमध्ये जुने वाडे, जुन्या निवासी इमारती आहेत, त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट, खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घेतले जात आहे. पावसाळी पर्यटनस्थळावर होणारी गर्दी लक्षात घेता अपघात होणार नाही, यासाठी पूर्वखबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदारांनी आपल्या क्षेत्रातील पर्जन्यमापकांची पाहणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकार्यांनी केल्या आहेत.