पिंपरी : महापालिकेचे अधिकारी चक्क सायकलवर ! | पुढारी

पिंपरी : महापालिकेचे अधिकारी चक्क सायकलवर !

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मोटारींमध्ये फिरणारे महापालिकेचे अधिकारी शनिवारी (दि. 3) चक्क सायकलवर कार्यालयात आले आणि सायकल फेरीतही सहभागी झाले. महापालिकेला सुटी असतानाही केवळ जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल फेरीमध्ये सहभाग घेण्यासाठी काही अधिकारी व कर्मचारी घरापासून पालिका भवनापर्यंत सायकलवर आले होते.

मनपा भवन ते नाशिक फाटा आणि नाशिक फाट्यावरुन पुन्हा पालिका भवन अशी ही सायकल फेरी काढण्यात आली. जगभरातील अनेक शहरामधील नागरिक दैनंदिन प्रवास हा सायकल व सार्वजनिक वाहतूक यांचा वापर करून आपली शहरातील प्रवासाची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच धर्तीवर केंद्र शासनाने चालणे, धावणे आणि सायकलिंगचा वापर वाढविण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये सायकलिंग, सार्वजनिक वाहतुकीचा वापर होण्यासाठी फ—ीडम टू रन, सायकल कॅम्पेन फॉर सिटी लिडर्स हा उपक्रम सुरू केलेला आहे.

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक सायकल दिन साजरा करण्यासाठी पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी शनिवारी (दि. 3) सकाळी 7 वाजता सायकल फेरीचे आयोजन केले होते. या सायकल फेरीमध्ये काही अधिकारी, कर्मचारी आपल्या घरापासून पालिकेपर्यंत स्वत:ची सायकल घेऊन फेरीत सहभागी झाले होते. पालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत येथे ज्यांच्याकडे सायकल नाही, अशा अधिकारी, कर्मचारी यांना सायकली महापालिका भवन येथे उपलब्ध करून दिल्या होत्या.

सायकल फेरीमध्ये स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, नितीन देशमुख, माणिक चव्हाण तसेच विविध विभागाचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, सुरक्षा कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपअभियंता संतोष कुदळे व सुनील पवार यांनी या सायकल फेरीचे नियोजन तसेच सुरक्षितपणे सायकलफेरी पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

हेही वाचा

पिंपरी : भोसरीतील कुस्ती संकुलातून घडताहेत नवे मल्ल

कपडे फाडण्याच्या भाषेवरून राजकारणाची पातळी घसरल्याचे दिसते..! सुषमा अंधारे

पुणेकरांचा रिंगरोड सुसाट; 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

Back to top button