पिंपरी: रात्रशाळेत शिकून 47 व्या वर्षी यश | पुढारी

पिंपरी: रात्रशाळेत शिकून 47 व्या वर्षी यश

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर्षभर काबाडकष्ट करून स्वतःच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड न पडू देता स्वतःचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणि शिक्षणाची असलेली ओढ तसेच स्वतःवर असलेला आत्मविश्वास यांची सांगड घालून वयाच्या 47 व्या वर्षी चिंतामणी रात्र शाळेतून 62 टक्के गुण मिळवून खुशालचंद पुणेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

त्यांनी केलेले कष्ट म्हणजे नियमित शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना लाजवेल असेच आहे. खुशालचंद यांचे 1990 साली नववीमधून शिक्षण अर्धवट राहिले. त्या वेळी ते ऊस तोडणीचे काम करत होते. त्यानंतर शहरात आल्यावर त्यांनी कंपन्यामध्ये छोटी मोठी नोकरी करून गुजराण करण्यास सुरुवात केली. यानंतर एका खासगी कंपनीत ते कायमस्वरूपी रूजू झाले. पण काही वर्षांनंतर ही कंपनी बंद पडली. त्यानंतर त्यांनी ड्रायव्हिंगचे कामे सुरू केले. सध्या याच कामावर ते आपले कुटुंब सांभाळत आहेत.

खुशालचंद यांना दोन मुलगे आहेत. एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअरींगचा डिप्लोमा करत असून दुसरा मुलगा नुकताच बारावी पास झाला आहे. यंदा बापलेकांनी बोर्डाची एकत्र परीक्षा दिली. इतक्या वर्षानंतर दहावीची परीक्षा देत असताना त्यांनी वर्षभरात एकही सुटी घेतली नाही की, शाळेला एकही दिवस खाडा केला नाही. ड्रायव्हिंग आणि रात्रशाळेत शिकणे असा खडतर प्रवास करून हे यश संपादन केले.

खुशालचंद यांना शिकण्याची खूप इच्छा आहे. वयात शिक्षण मिळाले असते तर आत्तापर्यंत खूप पुढे गेलो असतो, म्हणून पुढे सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे. कारण याला वयाची मर्यादा नसते. आता पुढे हा प्रवास असाच सुरू ठेवणार आहे.

हेही वाचा:

कोल्हापूर : अतिविषारी घोणसने दिला ७० पिल्लांना जन्म; बिद्रीच्या सर्पमित्राने दिले जीवदान

Migraine | डोकेदुखीकडे नका करू दुर्लक्ष, मायग्रेनचा त्रास तर नाही ना? जाणून घ्या कारणे आणि उपाय

एकनाथ खडसेंची पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा, नेमकं काय कारण?

 

 

Back to top button