पुणे: देहू नगरपंचायतीचा अतिक्रमणांवर हातोडा | पुढारी

पुणे: देहू नगरपंचायतीचा अतिक्रमणांवर हातोडा

देहुगाव, पुढारी वृत्तसेवा: संत तुकाराम महाराज 338 वा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त पालखी प्रस्थान सोहळा सुकर व्हावा, यासाठी देहू नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 2) सकाळी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दहा ते बारा होर्डिंग, जाहिरातीचे बोर्ड, अनधिकृत टपर्‍या आणि इतर दुकाने यांच्यावर कारवाईचा हातोडा उगारण्यात आला आहे.

देहू नगरपंचायतीच्या वतीने शहरातील अनधिकृत फ्लेक्स तसेच जहिरातीचे फलक काढण्याबाबतची कारवाई शुक्रवारपासून ( ता.2) हाती घेतली आहे. या कारवाईची सुरुवात माळीनगर भागापासून करण्यात आली. या कारवाईमध्ये रस्त्यावर असणारे अतिक्रमण, फ्लेक्स, जाहिरात फलक तसेच रस्त्यामधील टपर्‍या आदींवर कारवाई करून जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान नगर परिषदेतील सर्व विभाग प्रमुख तसेच मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम उपस्थित होते. पथदिव्यांच्या खांबावर लावलेले जाहिरात फलक, दुकानांसमोरील रस्त्यावरील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात काढण्यात आली.

कारवाई पुढेही सुरू राहणार

शहरातील पालखी सोहळ्यासाठी असणारा मार्ग तसेच इतर मार्ग यांच्या फुटपाथवरील तसेच दुकानासमोरील रस्त्यावरील अतिक्रमणे सर्व नागरिकांनी तात्काळ काढून घ्यावी. ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. ज्यांना अतिक्रमणासाठी नोटिसा देण्याची गरज आहे, त्यांना नोटिसा दिल्या आहेत. तसेच, वाहन फिरवून ध्वनिवर्धकावर अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत. परंडवल चौकातील मोठे जाहिरात होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू होती. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता ते काढताना त्यासाठी आवश्यक जास्त क्षमतेची क्रेन शुक्रवारी उपलब्ध होऊ शकली नाही. शनिवारी संबंधित धोकादायक होर्डिंगवरही कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.

मुख्याधिकारी डॉ. निकम भूमिकेवर ठाम

देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी नगरपंचायतीचे कर्मचारी, अधिकारी यांच्यासह एक जेसीबी, एक क्रेन आणि ट्रॅक्टर, देहूरोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी असा लवाजमा घेऊन माळीनगरपासून अतिक्रमणविरोधी करवाई करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी अनेक जणांनी विविध राजकीय नेत्यांची नावे सांगून आतिक्रमणविरोधी कारवाई थांबविण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. मात्र, डॉ. निकम हे कारवाईच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे ही अतिक्रमण विराधी कारवाई रोखण्याचे मनसुबे उधळले गेले.

हेही वाचा:

रूईछत्तीशी : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण; पाणवठे उभारण्याची गरज

पुणे: ‘उघड्यावर कचरा फेकल्यास कारवाई’

पुणे: संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या स्थळाकडे दुर्लक्ष

 

Back to top button