जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणार्या जेजुरी देवसंस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी स्थानिक ग्रामस्थांना डावलून बाहेरील गावच्या व्यक्तींची निवड केल्याने जेजुरीकर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ही नियुक्ती रद्द व्हावी व स्थानिकांना संधी द्यावी, या मागणीसाठी गेले आठ दिवस जेजुरीत धरणे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी (दि. 2) येथील श्री राम मयूरेश्वर मित्रमंडळ व ग्रामस्थांनी गडाच्या पायथ्यापासून दिवटी बुधली पेटवून, भंडारा उधळून निषेध केला.
बाहेरच्या विश्वस्त मंडळाची निवड रद्द करून स्थानिक विश्वस्त नियुक्त करावेत, या मागणीने जोर धरला आहे. विविध मंडळ, संघटना आंदोलने करीत आहेत. शुक्रवारी श्री राम मयूरेश्वर मित्रमंडळ राजवाडा चौक येथील आंदोलकांनी जेजुरीगडाच्या पहिल्या पायरीवर दिवटी बुधली पेटवून, भंडारा उधळत 'आंदोलनाला यश मिळू दे' असे साकडे देवाला घातले. त्यानंतर संबळ, तुणतुणे वाजवीत आणि पेटत्या दिवटी बुधली घेऊन शहरातून पदयात्रा काढली.
या आंदोलनात श्री राम मयूरेश्वर मंडळाचे कुमार गावडे, अमोल शिंदे, अतुल सावंत, मनोज शिंदे, दत्ता गावडे, शैलेश राऊत, संदीप कुतवळ, नीलेश शिंदे, अमोल भंडारी, गिरीश घोरपडे, मनोज मोहिते, समीर सोनवणे आदी सहभागी झाले होते. ग्रामस्थ मंडळाचे सुधीर गोडसे, जालिंदर खोमणे, संदीप जगताप, सचिन सोनवणे, अनिकेत हरपले, अजिंक्य जगताप, उमेश जगताप आदींनी धरणे आंदोलन केले. न्यायासाठी आंदोलन तीव्र केले जाणार आहे. आंदोलनाबरोबरच उच्च न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे हेमंत सोनवणे यांनी सांगितले.