पिंपरी : प्रवाशी नाही; अडीच कोटीचा बसथांबा | पुढारी

पिंपरी : प्रवाशी नाही; अडीच कोटीचा बसथांबा

मिलिंद कांबळे

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी ते वाकड या बीआरटी मार्गावर नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावर तब्बल अडीच कोटीचा उन्नत बस थांबा उभारण्यात आला आहे. जमिनीपासून 45 फूट अंतरावर हा थांबा आहे. या ठिकाणी प्रवाशांची ये-जा नसल्याने बस थांब्याचा किती उपयोग होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निव्वळ आर्थिक उधळपट्टीसाठी पालिकेने हा घाट घातल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील बीआरटी मार्गावरील बस थांब्याची दुरावस्था झाली आहे. अशा परिस्थितीत कासारवाडीतील नाशिक फाटा चौकातील जेआरडी टाटा उड्डाणपुलावर बीआरटीचा नवीन बसथांबा उभारण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल 2 कोटी 46 लाख लाखांचा खर्च झाला आहे. जमिनीपासून 45 फूट उंचीवर हा थांबा आहे. महिनाभरात हा थांबा बांधून तयार होणार आहे. नाशिक फाटा ते वाकड हा बीआरटी मार्ग आहे. भोसरीच्या बाजूने अद्याप बीआरटी मार्ग झालेला नाही. या मार्गावर पिंपळे गुरवचा कल्पतरू सोसायटी शेवटचा थांबा आहे. त्यापुढे उड्डाणपुलावर हा नवीन थांबा बनविण्यात आला आहे. या थांब्यावर प्रवाशांची फारशी ये-जा होत नाही.

या थांब्यावरून केवळ कासारवाडी भागातील नागरिकांना ये-जा करता येणार आहे. त्यासाठी 45 फूट उंच जिना चढावा लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना त्याचा वापर करता येणार नाही. नाशिक फाटा चौकातून या मार्गावर येण्यासाठी कनेक्टिव्हीटी नसल्याने नागरिकांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रवाशांचा प्रतिसाद नसताना इतक्या खर्चाचा थांबा का उभारला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देखभाल, दुरूस्तीअभावी थांब्याची दुरावस्था

महापालिकेने सांगवी फाटा ते किवळे, निगडी ते दापोडी, नाशिक फाटा ते वाकड, आळंदी रस्त्यांवरील बोपखेल ते चर्‍होली, काळेवाडी फाटा ते चिखली हे बीआरटीचे काम विकसित केले आहे. त्यासाठी कोट्यवधीचा खर्च केला आहे. मात्र, पीएमपीएमएलकडून पुरेशा संख्येने बसेस उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने या बीआरटी मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक नाही. तसेच, देखभाल व दुरूस्तीऐवजी अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे. काही थांबे तर भिकार्‍यांचे आश्रयस्थान झाले आहेत.

नव्या थांब्यामुळे हुल्लडबाजांची सोय ?

नाशिक फाटा उड्डाणपुलावरील रेल्वे मार्गाच्या फटीवर काँक्रीटचे छत टाकले आहे. त्या छतावर बसून दारू पित पार्टी केली जाते. तसेच, वाढदिवस साजरे केले जातात. छायाचित्र व व्हिडिओ रेकॉर्डीग करीत हुल्लडबाजी केली जाते. असे दृश्य या ठिकाणी रात्रीच्या वेळेस नेहमी दिसते. त्याच ठिकाणी नवीन बसथांबा बांधण्यात आला आहे. त्यामुळे मद्यपी व हुल्लडबाजी करणार्‍यांची एक प्रकारे सोयच होणार आहे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

एम्पायर इस्टेट उड्डाणपुलावर सव्वादोन कोटींचे थांबे :

चिंचवड येथील एम्पायर इस्टेट हाऊसिंग सोसायटीमधून जाणार्‍या मदर टेरेसा उड्डाणपुलावरील काळेवाडी फाटा ते चिखली बीआरटी मार्गावर पालिकेने बस थांबे बांधले आहेत. आठ वर्षांपूर्वी हा पुल वाहतुकीस खुला झाला. त्यावेळी या पुलावर दोन बसथांबे उभारण्यात आले. एका थांब्याचा खर्च 60 लाख इतका होता. असा एकूण 1 कोटी 20 लाख खर्च झाला. या दोन्ही थांब्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही.

प्रवाशांच्या सोईसाठी बस थांबा :

बीआरटी मार्गावरील नाशिक फाटा उड्डाणपुलावरील हा बस थांबा आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तो बांधण्यात येत आहे. अधिक उंचीवर असल्याने त्यांचा खर्च वाढला आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. या थांब्यामुळे नाशिक फाटा, कासारवाडी, शंकरवाडी भागांतील नागरिकांना वाकड तसेच, भोसरीच्या दिशेने ये-जा करण्याची सोय होणार आहे. भविष्यात दापोडी ते निगडी बीआरटी मार्ग, कासारवाडी रेल्वे स्थानक, मेट्रो येथील प्रवाशांसाठी कनेक्टिव्हीटी निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे पीएमपी बस, मेट्रो व रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

हेही वाचा:

बारामती तालुका दूध संघाची निवडणूक बिनविरोध, राष्ट्रवादीचे संघावर एकहाती वर्चस्व

साखर आयुक्तपदी चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती

छोटा राजनला मोठा झटका : Netflixची वेबसेरिज Scoopला स्थगिती नाही; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार | Chhota Rajan web series Scoop

Back to top button