पुणे : जुन्नर तालुक्यातील लग्नाळू शेतकरी तरुणाची दोन लाखांची फसवणूक | पुढारी

पुणे : जुन्नर तालुक्यातील लग्नाळू शेतकरी तरुणाची दोन लाखांची फसवणूक

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : शेतकरी तरुणांची लग्ने रखडण्याची मोठी सामाजिक समस्या सध्या ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत आहे. प्रत्येक गावात लग्न रखडलेल्या ३० ते ४० वयोगटांतील किमान २५-३० तरुण सध्या आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये लग्नासाठी विकत मुली आणण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्नर तालुक्यातील एका ३२ वर्षीय शेतकरी तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या तरुणाने या रॅकेटमध्ये सामील असलेल्या संबंधित एजंट व तरुणीसह एका महिलेबाबत आळेफाटा पोलिसांत लेखी तक्रार केली; परंतु फसवणूक झालेल्या तरुणाचे लग्न आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत न झाल्याने पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.

जुन्नर तालुक्यातील एका शेतकरी तरुणाला शेतकरी असल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. मुलगी मिळावी म्हणून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला पैसे दिल्यास मुलगी पाहूण देतो असे सांगितले. त्या व्यक्तीने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या एका एजंटशी संबंधित तरुणाचा संपर्क करून दिला. त्या एजंटने तरुणाला नाशिक जिल्ह्यातील एका गावात मुलगी दाखवली. मुलीला वडील नसून आई आजारी असल्याने आम्हाला मुलीचे लग्न करायचे असल्याचे सांगितले. यावेळी तरुणाला सांगण्यात आले की, तू शेतकरी असल्याने तुला मुलगी मिळणार नाही. तू या मुलीशी लग्न करून टाक, मुलीच्या आईला दोन लाख देऊया. त्या एजंटने आळंदी येथे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित तरुणाने एजंटला एक लाख रुपये दिले. १८ मे रोजी आळंदी येथील एका मंगल कार्यालयात थाटामाटात लग्न झाले. यावेळी मुलीला अडीच तोळे सोन्याचे दागिने घालण्यात आले व उर्वरित एक लाख सबंधित एजंटकडे देण्यात आले.

लग्नानंतर देवदर्शन, सत्यनारायण महापूजा व इतर धार्मिक विधी झाले. त्यानंतर मुलीला नाशिक येथे मावशीकडे सोडण्यात आले. त्यानंतर २५ तारखेला तरुणाने पत्नीला फोन करून कधी येते असे विचारले असता मुलीने मला नांदायचे नसल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणाने एजंटला प्रत्यक्ष भेटून घडलेली हकीकत सांगितली. यावेळी एजंटने संबधित तरुणी व तिची साथीदार महिला माझा फोन उचलत नसल्याचे सांगितले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्याने अधिक चौकशी केली असता, अशा प्रकारची फसवणूक जुन्नर तालुक्यात आणि संगमनेर (जि. अहमदनगर) येथेही झाल्याचे त्याला समजले.

जुन्नर तालुक्यातील तरुणाशी लग्न केल्यानंतर तरुणीने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात २३ मे रोजी लग्न करत दुसऱ्या एका तरुणाची फसवणूक केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला. यानंतर सबंधित तरुणाच्या लक्षात आले की आपली फसवणूक करणारी टोळी हीच आहे. हे एजंट व बनावट लग्न करणारी तरुणी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील आहेत. या तरुणाने आपल्या फसवणुकीबाबत लेखी तक्रार व लग्नाचे पुरावे घेऊन २९ मे रोजी आळेफाटा पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी तरुणाचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, हे लग्न आळेफाटा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाले नसल्याने यावर कोणतीही कार्यवाही करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्या तरुणाला वधूही मिळाली नाही आणि त्याचे दोन लाख रुपये, वधूच्या अंगावर घातलेले अडीच तोळे सोनेही गेले आहे. जुन्नर तालुक्यातील इतरही तरुणांची फसवणूक झाली असून फसवणूक होऊनही इज्जतीचा पंचनामा नको म्हणून पीडित कुटुंबीय चिडीचूप असल्याने या एजंटांचे प्रस्थ मात्र वाढत चालले आहे.

हेही वाचा : 

Back to top button