पुणे : नाट्यगृहात ‘उकाडा’ प्रयोग ! प्रेक्षक-कलाकार हैराण | पुढारी

पुणे : नाट्यगृहात ‘उकाडा’ प्रयोग ! प्रेक्षक-कलाकार हैराण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ऐन उन्हाळ्यातही प्रेक्षकांना-कलाकारांना नाट्यगृहांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा (एसी) व्यवस्थितरीत्या काम करत नसल्यामुळे सध्या ‘उकाडा’ प्रयोग सुरू असल्याचे चित्र आहे. प्रेक्षक उकाड्याने हैराण झाले असून, ही यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करावी, अशी मागणी कलाकारांसह प्रेक्षकांनी केली आहे. वातानुकूलन यंत्रणेसह नाट्यगृहात वाढलेला डासांचा प्रादुर्भाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे अशा समस्यांचा पाढा संपणार कधी? असा सवाल कलाकारांसह प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे.

बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांसह नाटकांचे प्रयोग होतात. परंतु, नाट्यगृहांमधील समस्यांमुळे कलाकार आणि प्रेक्षक हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा व्यवस्थितपणे काम करत नसल्यामुळे प्रेक्षक उकाड्याने हैराण झाले आहेत.

दुसरीकडे बालगंधर्व रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणा दुरुस्त केली असून, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा (एसी) लवकरच बदलण्यात येणार असल्याचे बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक विजय शिंदे यांनी म्हटले आहे. नाट्यनिर्मात्या भाग्यश्री देसाई म्हणाल्या, ‘नाट्यगृहातील समस्या तशा नव्या नाहीत. वातानुकूलन यंत्रणा चालू असूनही ती अंशत:च कार्यरत आहे. त्यामुळे प्रेक्षक-कलाकार उकाड्याने हैराण झाले आहेत. ही यंत्रणा योग्यरीत्या कार्यान्वित करावी.’

‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, ’आता ऐन उन्हाळ्यात बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही. त्यात बालगंधर्व रंगमंदिरात डास वाढल्यामुळेही प्रेक्षक वैतागले असून, ज्या पद्धतीने तिकीट काढून प्रेक्षक नाटक पाहायला येतो, त्या पद्धतीच्या सुविधा दिल्या जात नसल्याचे चित्र आहे.

वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम नियोजनात आहे. त्याबाबत विद्युत विभागाशी बोलणे झाले आहे. बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा बंद नाहीत. बालगंधर्व रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती केलेली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील संपूर्ण वातानुकूलन यंत्रणा बदलण्यात येणार आहे, त्याचे काम लवकरच सुरू होईल.

                                     – विजय शिंदे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर

Back to top button