पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर मार्ग काढा | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर मार्ग काढा

खोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उरुळी कांचनपासून ते हडपसरपर्यंत वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होऊ लागला असून, यावर मार्ग काढण्याची मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची भेट घेऊन केली. रात्रीच्या वेळी पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी बस थांबतात.

त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच लोणीकाळभोर ते हडपसर दरम्यान वारंवार होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून या नित्याच्या कोंडीवर मार्ग काढण्याबाबत आता पोलिस प्रशासनाने पावले उचलण्याची गरज बनली आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने वेळेवर नागरिकांना पोहचण्यास मोठी अडचण तर निर्माण होतेच; मात्र रुग्णवाहिकादेखील अडकून पडत असल्याने रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत.

पोलिस प्रशासनाने वाहतूक कोंडीबाबत वेळीच नियम घालून नागरिकांचा व प्रवासी वर्गाचा होणारा मनस्ताप कमी करावा, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडे केली. दरम्यान मगर यांनी याबाबत सकारात्मकता दाखवत या वाहतूक कोंडीवर निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार चेतन तुपे, आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, प्रवीण काळभोर आदी उपस्थित होते.

लवकरच उड्डाणपुलांची कामे

महामार्गावरील नित्याची वाहतूक कोंडी तसेच रस्तारुंदीकरणासाठी जागेची अडचण लक्षात घेता हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल व्हावा, या महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागातील ‘रोड जंक्शन’वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत, दौंड तालुक्याच्या हद्दीतील अतिरिक्त सेवा रस्ते आणि स्लीप रोडचे काम पूर्ण करावे, वरवंड येथे अतिरिक्त नवीन भुयारी मार्ग उभारण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. या दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे कुल यांनी सांगितले.

Back to top button