नऱ्हे : दारुसाठी आईने दिले नाहीत पैसे; मुलाने केला खून

नऱ्हे : दारुसाठी आईने दिले नाहीत पैसे; मुलाने केला खून

पुणे, पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईचा हातातील कड्याने, सुरी, लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार नर्‍हे येथे घडला. दसऱ्याच्या सणादिवशीच हा प्रकार घडला.

सिंहगड रोड पोलिसांनी आईचा खून करणाऱ्या मुलाला अटक केली आहे. सचिन दत्तोपंत कुलथे (वय 31, रा. महालक्ष्मी आंगन, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर, विमल दत्तोपंत कुलथे (वय 60) असे खून झालेल्या आईचे नाव आहे.

याप्रकरणी अनिता मोहन चिंतामणी (वय 44, रा. नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि त्याची आई विमल कुलथे हे दोघे जण रहात होते. सचिन याला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्याच्या या व्यसनामुळे त्याची पत्नी त्याला एक वर्षापूर्वी सोडून माहेरी निघून गेली आहे.

चालक म्हणून काम करणारा सचिन गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होता. मौजमजा करण्यासाठी तो आईकडे नेहमी पैशांची मागणी करत असे. दारुसाठी पैसे न दिल्याने शुक्रवारी त्याने आईला सुरीने व लाकडाच्या दांडक्याने मारहाण केल्याने यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने फिर्यादी बहिणीला याची माहिती दिल्याने ही घटना समोर आली. घटनेनंतर तो फरार झाला होता.

घटस्थापनेच्या दिवशी अनिता चिंतामणी या आपल्या आईला भेटायला माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना आपल्या आईच्या अंगावर वळ दिसले. तेव्हा त्यांनी चौकशी केल्यावर सचिनने मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले होते. कोणालाही तो घरी येऊ देत नसे. फिर्यादी यांनी आपण पोलिसांकडे तक्रार करु असे सांगितल्यावर मुलगा आणखी मारेन, म्हणून त्यांनी तक्रार करायला नकार दिला व तू सारखी येत जाऊ नको, असे त्यांना सांगितले होते.

आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अनिता चिंतामणी यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला स्वामी नारायण मंदिराजवळ असणार्‍या टेकडी परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.

सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे म्हणाले की, "आईचा खून केल्यानंतर पळून गेलेल्या सचिनला पोलिसांनी स्वामी नारायण मंदिराजवळ असणार्‍या टेकडी परिसरातील जंगलातून ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

सहा मुलीनंतर झाला वंशाचा दिवा

सहा मुली झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला. एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे सर्वांनीच लाड केले. विमल कुलथे यांच्या पतीचे 2015 ला निधन झाले. सचिनला दारूचे व्यसन असल्याने त्याला दारुसाठी पैसे हवे होते. मात्र आईने पैसे देण्यास नकार देताच वंशाचा दिवा म्हणून आयुष्यभर लाडात वाढवलेल्या मुलाने पैशासाठी आईलाच ठार मारले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news