पुणे, पुढारी वृत्तसेवा : लेफ्टनंट कर्नल महिलेने आत्महत्या (Suicide) केली आहे. पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवून अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी वरिष्ठ लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर याच्या कारनाम्यामुळेच दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आत्महत्येप्रकरणी वानवडी पोलिसांनी वरिष्ठ लष्करी अधिकारी बिग्रेडिअर अजित मिलू (सध्या रा. बिग्रेडियर जनरल स्टाफ, हेड क्वॉटर्स, आर्मी ट्रेनिंग कमांड, सिमला, हिमाचल प्रदेश) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केलेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्येचा (Suicide) ही घटना वानवडीतील ऑफिसर मेसमध्ये १३ ऑक्टोबर रोजी घडली होती. हा प्रकार २०१९ पासून १२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला होता. लेफ्टनंट कर्नल असलेल्या ४२ वर्षाच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचे पतीही हे जयपूर येथे लष्करी सेवेत असून या घटनेनंतर ते पुण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेफ्टनंट कर्नल असलेल्या या महिला सिमला येथे कार्यरत होत्या. या काळात २०१९ पासून त्यांचे वरिष्ठ अधिकारी बिग्रेडिअर अजीत मिलू यांनी त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे वचन देऊन त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले. त्यांचे अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करुन या महिलेला ते बदनामी करण्याची धमकी देत होते.
गेल्या काही महिन्यांपासून त्या प्रशिक्षणासाठी सिमल्याहून पुण्यात आल्या होत्या. बिग्रेडियर अजित मिलू यांच्या धमक्यांना घाबरुन त्यांनी १३ आक्टोबर रोजी आत्महत्या केली. वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. त्यांच्या पतीने फिर्याद दिल्यानंतर आता आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साळगावकर अधिक तपास करीत आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक वानवडीचे दीपक लगड म्हणाले की, "महिलेच्या आत्महत्येनंतर लष्करातील वरिष्ठ अधिकारी हा महिलेच्या आत्महत्येला जबादार असल्याचा गुन्हा वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तपासामध्ये निष्पन्न झालेल्या बाबीनुसार पुढे योग्य ती कारवाई करण्यात येईल."