पुणे: बालकाला जन्म दिल्यानंतर काहीही विचार न करता त्याला रुग्णालयाच्या खिडकीतून फेकले | पुढारी

पुणे: बालकाला जन्म दिल्यानंतर काहीही विचार न करता त्याला रुग्णालयाच्या खिडकीतून फेकले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पाठ दुखत असल्याचे सांगत रूग्णालयात दाखल होऊन अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या 19 वर्षीय तरूणीने बालकाला जन्मदेत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला रूग्णालयाच्या खिडकीतून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सिंहगड रस्ता भागातील एका रूग्णालयात घडली. या प्रकरणी एका तरुणीच्या विरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणी सिंहगड रस्ता परिसरातील एका वसतीगृहात राहते. अनैतिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. दरम्यान, आठ महिने झाल्यानंतर ती पाठीच्या आजाराचे कारण सांगून नर्‍हे परिसरातील एका रुग्णालयात दाखल झाली. पाठ दुखत असून अशक्तपणा जाणवत असल्याचे तिने रुग्णालयात सांगितले. गर्भवती असल्याचे तिने रुग्णालयापासून लपवून ठेवले होते.

ती रुग्णालयातील एका स्वच्छतागृहात गेली. तिथे तिने एका बालकाला जन्म दिला आणि काहीही विचार न करता तिने नवजात बालकाला खिडकीतून बाहेर फेकून दिले. या घटनेत नवजात बालकाचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Back to top button