जुन्नर : चोरट्याचा पाठलाग करणे बेतले जिवावर; तिघांवर चाकूने हल्ला | पुढारी

जुन्नर : चोरट्याचा पाठलाग करणे बेतले जिवावर; तिघांवर चाकूने हल्ला

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहराच्या भर वस्तीमधील राहत्या घरामध्ये बुधवारी (दि. 5) रात्री 12 वाजेच्या दरम्यान चोरीच्या हेतूने घुसलेल्या तरुणाचा पाठलाग करण्यात आला. या वेळी या तरुणाने आपल्याकडील धारदार चाकूने तीन जणांना मारहाण करीत जखमी केले. यामधील एकाची प्रकृती गंभीर आहे. मोहंमद खालिद सौदागर (वय 55, रा. कागदीवाडा, जुन्नर) यांनी या घटनेची फिर्याद नोंद केली आहे. आखलाक असिफ शेख (रा. कागदीवाडा, जुन्नर) याला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

सौदागर यांच्या राहत्या घरामध्ये रात्री 12 वाजेच्या सुमारास आखलाक हा चोरीच्या उद्देशाने घुसला. या वेळी मोहंमद यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून गेला. जुबेर सौदागर, सैफ उलहक सौदागर हे त्याच्या मागे पळत जाऊन त्यांनी त्याला कागदीवाडा मशिद येथे पकडले.

या वेळी झालेल्या झटपटीमध्ये आकलाख याने आपल्याकडील धारदार चाकूने जुबेर याला भोसकून जबर जखमी केले, तर सैद उलहक व मोहंमद यांनाही चाकूने मारहाण करीत जखमी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. जुन्नर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे करीत आहेत. दरम्यान, आकलाख याच्यावर यापूर्वीही अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे.

Back to top button