पुणे : अखेर पीएमपीला पीएमआरडीएकडून 50 कोटी

पुणे : अखेर पीएमपीला पीएमआरडीएकडून 50 कोटी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमआरडीए भागात सेवा पुरविण्याच्या बदल्यात आम्हाला संचलन तूट मिळावी, ही पीएमपी प्रशासनाची मागणी अखेर खर्‍या अर्थाने पुर्ण झाली आहे. सोमवारी पीएमपीला पीएमआरडीए प्रशासनाने 188 कोटींपैकी 50 कोटी रूपयांचा धनादेश दिला आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. पीएमपीच्या ताफ्यात एकूण 2 हजार 142 बस आहेत. यापैकी 24 टक्के सेवा पीएमपी पीएमआरडीए भागात पुरवते. रोज 490 बस पीएमआरडीए भागातील 113 मार्गावर धावतात.

या गाड्यांच्या रोजच्या 4 हजार 918 फेर्‍या पीएमआरडीए भागात होतात. तब्बल 2 लाख 53 हजार 506 प्रवासी दररोज प्रवास करतात. या सेवेच्या माध्यमातून पीएमपीला रोज 35 लाख 67 हजार 315 रूपये उत्पन्न मिळते. मात्र, पीएमपी प्रशासनाला पीएमआरडीए भागात सेवा पुरविण्यामुळे वर्षाला 188 कोटी रूपयांचा वार्षिक तोटा सहन करावा लागतो. परंतु, तरी देखील पीएमपी प्रशासनाने या भागातील आपली सेवा बंद केलेली नाही. याऊलट पीएमपीने पीएमआरडीएकडे बर्‍याच वर्षांपासून संचलन तूट मिळावी, अशी मागणी केली होती. सोमवारी (दि.05) ती मागणी पूर्ण झाली. अन पीएमपीला 50 कोटींचा धनादेश पीएमआरडीएने दिला. आता या पैशांचा वापर कशा प्रकारे होणार, याची पीएमपी कर्मचार्‍यांना उत्सुकता लागली आहे.

पीएमपी कर्मचार्‍यांची अपेक्षा…

कर्मचार्‍यांना मागील काही महिन्यांपुर्वी पैशांची तंगी असतानाही पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी निम्मा सातवा वेतन आयोग लागू केला. आता बकोरिया यांनी उर्वरित सातवा वेतन आयोग या मिळालेल्या संचलन तूट मधून लागू करावा, अशी अपेक्षा पीएमपी कर्मचार्‍यांची आहे.

पुणेकरांची अपेक्षा…

पुणे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीच्या ताफ्यात बसची संख्या खूपच कमी आहे. त्यातच पीएमपी प्रशासन आपल्या बसद्वारे पीएमआरडीए भागात बससेवा पुरवत आहे. त्यामुळे पुणेकरांना गाड्या अपुर्‍या पडत असून, गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. प्रवाशांना वेळेवर गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ताफ्यात नव्या गाड्या घ्याव्यात, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.

पीएमआरडीएकडून आम्हाला 50 कोटींचा धनादेश मिळाला आहे. उर्वरित रक्कम आम्हाला लवकरच मिळेल. ही रक्कम आम्ही आम्हाला सेवा पुरविताना येणार्‍या संचलन तूटीच्या बदल्यात वापरणार आहे.

– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news