पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 10 लाख ऊसतोड कामगारांच्या जिव्हाळाच्या प्रश्नांबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीय, वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्याकरिता अपघात विमादेखील प्रस्तावित केला आहे. मात्र, विमा योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी अवधी लागत असल्याने सद्य:स्थितीत अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीय- वारसांना तातडीने 5 लाखांची मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या संदर्भात महामंडळाकडे राज्यातून प्राप्त झालेल्या 67 प्रकरणांमध्ये प्रत्येकी 5 लाख याप्रमाणे एकूण 3 कोटी 35 लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांना वितरित केला आहे.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश डोके व व्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी यांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला होता व त्यांच्या मागणीला यश आले आहे.
हेही वाचा