मल्टिफीड डिस्टिलरीजला प्राधान्य द्या : अमित शहा | पुढारी

मल्टिफीड डिस्टिलरीजला प्राधान्य द्या : अमित शहा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशातील साखर कारखान्यांनी मका आणि उसापासून इथेनॉल तयार करण्यासाठी मल्टिफीड डिस्टिलरीजची स्थापना करण्यास प्राधान्य द्यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केली आहे. तसेच, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कामकाज कॉर्पोरेटच्या धर्तीवर चालविण्यात यावे आणि महासंघाने साखर क्षेत्रात प्रमुख भूमिका बजावावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारक्षेत्राची भरभराट होईल आणि त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय कार्यतत्पर असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची, तर उपाध्यक्ष म्हणून केतनभाई पटेल यांची एकमताने नुकतीच निवड झाली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाने केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्या वेळी शहा यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करीत महत्त्वपूर्ण सूचना केल्याची माहिती महासंघाने पत्रकान्वये कळविली आहे.

देशात 259 सहकारी साखर कारखाने आणि नऊ राज्य साखर संघ यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नवी दिल्ली येथे 15 आणि 16 फेब—ुवारी रोजी घेण्यात आली. त्यासाठी पहिल्यांदाच सहकार मंत्रालयाने निवडणूक प्राधिकरण गठित केले होते. या निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, पंजाब आणि ओडिशा या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे एकूण 12 संचालक निवडून आले. त्यात महाराष्ट्रातील पाच, कर्नाटकातील दोन, गुजरातमधील दोन आणि उत्तर प्रदेश, पंजाब आणि ओडिशामधील प्रत्येकी एक असे आहेत.

त्यामध्ये ईश्वरसिंह टी. पटेल (गुजरात), अशोक आर. पाटील (कर्नाटक) आणि जयप्रकाश दांडेगावकर (महाराष्ट्र), केतनभाई चिमणभाई पटेल (गुजरात), अमित प्रभाकर कोरे (कर्नाटक), प्रकाश कल्लाप्पा आवाडे (दक्षिण महाराष्ट्र), हर्षवधन शहाजीराव पाटील (दक्षिण-मध्य महाराष्ट्र), विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील (मध्य महाराष्ट्र), नरेंद्र भगवानराव चव्हाण (उत्तर महाराष्ट्र), तरलोचन सिंग (पंजाब), वीरेंद्र राणा (उत्तर प्रदेश) यांचा आणि रवींद्र पांडा (ओडिशा) निवडून आले. नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक निर्वाचन अधिकारी मेकाला चैतन्य प्रसाद यांंच्या अध्यक्षतेखाली झाली.

हेही वाचा

Back to top button