शहीद ओझरकर यांच्या मुलांना पाच लाखांची शैक्षणिक मदत

शहीद ओझरकर यांच्या मुलांना पाच लाखांची शैक्षणिक मदत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भवानी पेठ परिसरातील शहीद वीर जवान कै. दिलीप ओझरकर यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच लाखांची मदत दिली. ही मदत नुकतीच भाजप पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ओझरकर कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आली. दिलीप ओझरकर हे लेह-लडाख भागांत देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचा तेरावा विधी नुकताच भवानी पेठेतील त्यांच्या घरी झाला. त्या वेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत ओझरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्या वेळी या वीर जवानाच्या कुटुंबाला भेटल्यानंतर त्यांना मदत करण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार पाटील यांनी भाजपतर्फे या शहीद जवानांच्या दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी 5 लाख रुपयांचा धनादेश सोमवारी भाजप पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील व माजी स्थायी समिती सदस्य अर्चना पाटील यांच्या मार्फत कुटुंबीयांना दिला. 'देशासाठी बलिदान दिलेली व्यक्ती जरी परत येणार नसली, तरी त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा दिलेला हा हात आयुष्य थोडेफार सुकर करेल,' अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.

या वेळी शहीद कुटुंबातील जवानाची पत्नी, त्यांची चिमुकली मुले आणि आई-वडील उपस्थित होते. तसेच स्थानिक गणपती मंडळाचे अध्यक्ष नीलेश राऊत, उमेश यादव, संध्या पवार, दिनेश रासकर, राहुल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप आणि पदाधिकारी हे वीर जवान आणि कुटुंबीयांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news