चिखलीत तरुणावर जीवघेणा हल्ला | पुढारी

चिखलीत तरुणावर जीवघेणा हल्ला

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यात घराचा पत्ता विचारत तिघांनी मिळून तरुणाला स्क्रू ड्रायव्हरने मारहाण केली. तसेच, दुसर्‍या तरुणावर कोयत्याने वार करीत जीवघेणा हल्ला चढवला. चिखलीतील घरकूल येथील एकता हाउसिंग सोसायटीसमोरील रस्त्यावर बुधवारी (दि. 29) हा प्रकार घडला. अमित अशोक चव्हाण (33, रा. घरकूल, चिखली) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. 29) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ओंकार ओव्हाळ आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी धीरज आढाव हे रस्त्याने चालले होते. त्या वेळी आरोपींनी त्यांचा रस्ता अडवून त्यांना फिर्यादी यांचा पत्ता विचारला. धीरज आढाव यांनी टाळाटाळ केली असता आरोपींनी त्यांना स्क्रू ड्रायव्हरने मारहाण केली. त्यानंतर अमित चव्हाण याचे घर दाखव नाही तर तुझा मर्डर करेल, अशी धमकी देत आरोपींनी धीरज आढाव याला दुचाकीवर बसवून त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. त्यानंतर आढाव याने फिर्यादी यांचे घर दाखविले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. यामध्ये झालेल्या झटापटीमध्ये धीरज आढाव याच्या डोक्याला मार लागून दुखापत झाली आहे. चिखली पोलिस तपास करत आहेत.

Back to top button