Exclusive: पोलिसांच्या ताब्यातील गाडीच चोरट्यांनी पळवली, पोलिस आयुक्तांना चौकशीचे मोक्का न्यायालयाचे आदेश | पुढारी

Exclusive: पोलिसांच्या ताब्यातील गाडीच चोरट्यांनी पळवली, पोलिस आयुक्तांना चौकशीचे मोक्का न्यायालयाचे आदेश

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मोक्काच्या गुन्ह्यात येरवडा पोलिसांनी जप्त केलेली चार चाकी गाडी (इर्टिंगा) चोरी गेल्याप्रकरणी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी पोलिस आयुक्तांना संबंधीत अधिकार्‍यांची चौकशी करून न्यायालयाला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

याबाबत तक्रारदाराचे वकील अ‍ॅड. सोमनाथ भिसे यांनी सांगितले की, मोक्काच्या गुन्ह्यात तक्रारदार कृष्णा सुरेंद्र सिंग यांची गाडी जप्त करण्यात आली होती. ती त्यांनी परत मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने तक्रारदाराला त्यांची कार परत करण्याचे आदेश दिले होते. संबंधित न्यायालयाचा आदेश घेऊन सिंग हे येरवडा पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी येरवडा पोलिस त्यांच्या ताब्यात असलेल्या गाडीची चावी सोबत घे्ऊन गाडी लावलेल्या वाहतुक विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी शोधायला गेले. त्यावेळी गाडी तेथे आढळून आली नाही. दरम्यान सिंग याला येरवडा पोलिसांनी दुसर्‍या दिवशी येण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी सांगितल्याप्रमाणे सिंग हे गाडी शोधण्यासाठी गेले असता त्यांना त्यावेळी कोणीही भेटले नाही. दरम्यान सिंग यांच्या वतीने अ‍ॅड. भिसे यांनी पुन्हा कोर्टात अर्ज करून न्यायालयाने आदेश देऊनही पोलिसांनी गाडी परत केली नाही. या अर्जावर न्यायालयाने म्हणणे मागवले. त्यावर पोलिसंनी न्यायालयाला लेखी अहवाल सादर करून संबंधित कार ही दोन तीन जण चोरून असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याची माहिती दिली. हे फुटेज सप्टेंबर 2022 चे आहे, याबाबत आम्ही जानेवारी 2023 मध्ये गुन्हा दाखल केल्याचे न्यायालयाला सांगितले.

कोर्टाचा आदेश असताना कार परत दिली नाही. त्यानंतर न्यायालयाने खुलासा मागवला. परंतु, लवकर खुलासा पोलिसांनी दिला नाही. खुलासा येत नाही असा अर्ज आम्ही केला. त्यावर कोर्टाने कारणे दाखवा नोटीस काढली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कार चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, न्यायालयात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या सहीने खुलासा दाखल करण्यात आला. परंतु, न्यायालयाने तो खुलासा माघारी पाठवत तो सहायक पोलिस आयुक्तांच्या सहीने आणा असे तोंडी आदेश दिले. नंतर तो खुलासा सहायक पोलिस आयुक्ताच्या सहीने आल्यानंतर न्यायालयाने पोलिस आयुक्ताना संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
– अ‍ॅड. सोमनाथ भिसे, तक्रारदार आरोपीचे वकील.

Back to top button