पुणे : वृध्द महिलांना खोटे सोने देऊन गंडा घालणार्‍या टोळीला ठोकल्या बेड्या | पुढारी

पुणे : वृध्द महिलांना खोटे सोने देऊन गंडा घालणार्‍या टोळीला ठोकल्या बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बनावट सोन्याचे बिस्कीट, चिप, सोन्याची वेढणी खरी असल्याचे सांगून वृध्द महिलांच्या अंगावरील खरे सोने काढून घेत बनावट सोने देऊन फसवणूक करणार्‍या टोळीला हडपसर पोलिसांच्या पथकाने बीड तसेच पुण्यातून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत बारा लाख रूपयांचा ऐवज आणि 10 गुन्हे उघडकीस आणण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे.

गणेश विनायक गायकवाड (वय 32), रमेश विनायक गायकवाड (वय 30), हरिभाऊ मोहन कासुळे (वय 35, तिघेही रा. रा. मु. पो. भालगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), बंडु लक्ष्मण जाधव (वय 42) आणि महादेव आसाराम जाधव (वय 50, रा. पाटोदा बीड) असे अटक करण्यात आलेल्या टोळीचे नाव आहे.

अशी होती गुन्हा करण्याची पध्दती

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बस स्टॉप व इतर परिसरातून प्रवासातील ज्येष्ठ नागरिक महिलांना हेरून त्यांना दिसेल असे बिस्कीट, चिप, सोन्याची वेढणी रस्त्यावर टाकून त्यानंतर आपण हे दागिने आपआपसात वाटून घेऊ पण सापडलेला दागिना तोडता येणार नसल्याने तुमच्या अंगावरचे दागिने मला द्या, असे सांगुन वृध्द महिलांना त्याच्या अंगावरच्या दगिन्यांपेक्षा प्रवासात सापडलेले दागिने हे जास्त वजनाचे व किंमतीचे असल्याने स्वतः जवळील सोन्याच्या बद्ल्यात जास्त किंमतीचे सोने मिळते असे म्हणून अमिषाला बळी पाडले जात होते. असे गुन्हे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1, तसेच हडपसर पोलिस ठाण्यात हद्दीतील गुन्हे असे मिळून टोळीवर दहा गुन्हे दाखल असल्याचे या गुन्ह्यांविषयी माहिती घेतना समोर आले.

अशी केली अटक

तांत्रिक विश्लेषणावरून अमंलदार संदीप राठोड यांना गुन्ह्यातील आरोपी बीड येथून पुणे शहर, चाकण, जेजुरी येथे चार ते पाच दिवस मुक्काम करून गुन्हा करून परत बीड येथे जात होते. हा धाक पकडत पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अमंलदार समीर पांडुळे, निखील पवार, भगावान हंबर्डे यांचे पथक बीडला पाठविण्यात आले. दरम्यान त्यातील काही आरोपी पुण्यातच गुन्हा करण्यासाठी येत असल्याची माहिती पथकला मिळाली. त्यानुसार पथकाने गणेश गायकवाड, रमेश गायकवाड, बंडु जाधव, हरिभाऊ जाधव यांना विश्रांतवाडी परिसरातून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडील तपासात त्यांनी हडपसर गाडीतळ येथील बसस्टॉप, भोसरे बस डेपो, चाकण बसडेपो येथून मागिल दोन वर्षापासून गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान त्यांच्याकडील माहितीच्या आधारे महादेव जाधव याला बीड येथून अटक करण्यात आली.

अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अमंलदार सुशील लोणकर, शाहिद शेख, निखील पवार, सचिन गोरखे, अतुल पंधरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक वाचा :

Back to top button