लालपरी मालामाल; महिला सन्मान, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनांचा फायदा
Pune News: एसटीच्या योजना पुणे विभागात सुरू झाल्यापासून आतापर्यंत 49 लाख प्रवाशांनी त्यांचा लाभ घेतला आहे. त्याद्वारे सरासरी 16 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळाला आहे. या योजनांंमुळे पुणे विभागाच्या उत्पन्नात भर पडली असून, प्रवासी संख्येतही वाढ होत आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनांमुळे एसटीला नवसंजीवनी मिळाली आहे. या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत आणि उत्पन्नाला मोठा हातभार लागला आहे. एसटीची कमी झालेली प्रवाशांमधील ओढ, पुन्हा नव्या गाड्या आणि या नव्या योजनांमुळे वाढीस लागली आहे. महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत असल्यामुळे महिला प्रवाशांचीही संख्या वाढत आहे. तसेच, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक प्रवास करण्याचा आनंद घेत आहे.
या योजनांना उत्तम प्रतिसाद
एसटीच्या ताफ्यातील सर्व बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करता येत आहे. त्याकरिता महिलांना बसमध्ये वाहकाला आधार कार्ड दाखवावे लागत आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनादेखील प्रवासादरम्यान वाहकाला आधार कार्ड दाखवावे लागते. तर आरक्षणासाठी 5 रुपये आरक्षण चार्जेस द्यावे लागतात.
एसटीच्या योजना सुरू झाल्यापासून बस गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 49 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्याद्वारे सरासरी 14 कोटींपर्यंत महसूल मिळाला आहे.- प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग.

