पोलिस भरती लेखी परिक्षेच्यावेळी दोन डमी उमेदवार सापडले | पुढारी

पोलिस भरती लेखी परिक्षेच्यावेळी दोन डमी उमेदवार सापडले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे पोलिस आयुक्तालयाकडून रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या पोलिस भरती च्या लेखी परिक्षेवेळी दोन ठिकाणी डमी उमेदवार बसल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे.

लेखी परिक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांकडून फोटो व व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत होते. तसेच, हॉल तिकीटावरील फोटो व प्रत्यक्ष फोटो अशी तपासणी केली जात होती. त्यावेळी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स व सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड इन्स्टिट्यूट मॅनेजमेन्ट ऍन्ड कंम्प्युटर ऍप्लीकेशन या ठिकाणी डमी विद्यार्थी आढळून आले आहेत.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स येथे योगेश कौतिकराव गवळी या तरुणाच्या जागेवर बाळासाहेब भीमराव गवळी (रा. धावडा, भोकरदन, जानला) हा परिक्षा देताना आढळून आला. तसेच, या तरुणाला परिक्षा देण्यासाठी मदत करणार्‍या सुरज भोपळावत (रा. सांजखेडा, औरंगाबाद) याला ही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मगन प्रल्हाद घाटुळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डमी उमेदवार बाळासाहेब गवळी व भोपळावत यांंनी मुख्य उमेदवारासोबत काही आर्थिक व्यवहार केला आहे का याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

तर दुसरी घटना सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड इन्स्टिट्यूट मॅनेजमेन्ट ऍन्ड कंम्प्युटर ऍप्लीकेशन या केंद्रावर महेश सुधाकर दांडगे (रा. एट भराज खुर्द, जाफराबाद, जालना) या उमेदवाराच्या जागेवर विठ्ठल किसन जारवाल (रा. पिंपळगाव, औरंगाबाद) याला पकडण्यात आले आहे. यावेळी अन्य एका व्यक्तीने यासाठी मदत केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विशाल जगन्नाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जारवाल याने दांडगे याच्याकडून पाच लाख रुपये परिक्षेला बसण्यासाठी घेण्याची बोली केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. इतर कोणत्या ठिकाणी आरोपी अशाप्रकारे लेखी परिक्षेच्यावेळी डमी म्हणून बसले आहेत का याचा देखील पोलिस तपास करत आहेत.

12 हजार 27 उमेदवारच उपस्थित

पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलिस शिपाई पदासाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. यासाठी 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांची लेखी परिक्षा मंगळवारी 79 केंद्रावर पार पडली. या परिक्षेला 12 हजार 27 विद्यार्थीच उपस्थित होते. यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लेखी परिक्षेसाठी केंद्रावर आलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्रासोबत सद्यस्थितीतील एक फोटो घेऊन येणे बंधनकारक होते. प्रवेश पत्रावरील फोटो व त्यांचा सद्यस्थितीतील फोटो तपासला असता फरक दिसून आला. संशय निर्माण झाल्यामुळे इतर कागदपत्रे व डमी उमेदवारांची कसून चौकशी केली त्यावेळी हा प्रकार समोर आला. आत्तापऱ्यंत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलिस आयुक्त प्रशासन

Back to top button