पुणे : भवानी पेठेत वाड्याला आग; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू | पुढारी

पुणे : भवानी पेठेत वाड्याला आग; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकात जुन्या वाड्याला गुरुवारी (दि. 2) रात्री लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा होरपळून मृत्यू झाला. ज्येष्ठ नागरिक वाड्यात एकटा राहत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. नीलेश ठक्कर (वय 70, रा. मणीभवन वाडा, पालखी विठोबा चौक, भवानी पेठ) असे मृताचे नाव आहे. पालखी विठोबा चौकात मणीभवन जुना लाकडी वाडा आहे. वाडा दुमजली आहे. सध्या वाड्यात कोणी राहत नाही. ठक्कर वाड्यात एकटेच राहत असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

रात्री साडेअकराच्या सुमारास वाड्यात अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. केंद्रप्रमुख गजानन पाथ—ुडकर, राजेश जगताप, प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. जवानांनी वाड्याची पाहणी केली. तेव्हा वाड्यातील स्वच्छतागृहात नीलेश ठक्कर बेशुद्धावस्थेत सापडले. जवानांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला.

 

Back to top button