मराठी चित्रपटांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा; चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना | पुढारी

मराठी चित्रपटांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा; चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहा-सात महिन्यांनी मराठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या 204 मराठी चित्रपटनिर्मात्यांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, चित्रपटांना आता अनुदान वेळेवर मिळू शकणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना केली आहे.

या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजित साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख यांचा समावेश आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.25) शासकीय अध्यादेश जारी करण्यात आला. ही समिती अस्तित्वात आल्यामुळे अनुदान मिळण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या 204 चित्रपट निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे.

सरकारकडून नवोदित, दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान देण्यात येते. महाआघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर जवळपास एक वर्षाने समितीच्या पुनर्रचनेला मुहूर्त लागला. पण, समितीचे काम संथगतीने सुरू राहिले. चित्रपट अनुदान समितीची लवकरच पुनर्रचना करण्यात येईल, असे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

Back to top button