पारगाव : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार | पुढारी

पारगाव : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

पारगाव (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : पारगाव येथील लबडेमळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली. ही घटना रविवारी
(दि. 22) सायंकाळी घडली. या घटनेमुळे लबडेमळा, पारगाव परिसरात घबराट पसरली आहे. पारगाव ते धामणी रस्त्यावर लबडेमळा येथे राहणारे दत्तात्रय दादाभाऊ रोडे यांच्याकडे चार शेळ्या, दोन वासरे, दोन करडे आहेत. रविवारी (दि. 22 ) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका शेळीचा ओरडण्याचा आवाज झाला.

दत्तात्रय रोडे यांची मुलगी वैष्णवी दत्तात्रय रोडे हिने आवाज ऐकून ती घरातून धावत बाहेर आली. तिने बिबट्याला पाहिले. तेव्हा बिबट्या शेळीवर हल्ला करत होता. वैष्णवीने आरडाओरडा करून हातातील लाकडी काठी बिबट्याकडे फेकली. त्यानंतर बिबट्या शेळीला जागेवरच सोडून बाजूच्या ऊसशेतात पळून गेला.

वैष्णवी व तिच्या घरच्यांनी जखमी शेळीला उचलून घराकडे नेत असतानाच शेळी मृत झाली. घटनेची खबर माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी वन विभागाला दिली. वनरक्षक साईमाला गिते यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. वन विभागाने दत्तात्रय रोडे यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शिवाजी पोंदे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे आणि ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button