भिडे वाडा स्मारकचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर? चंद्रकांत पाटलांनी घेतली थेट भिडे वाड्याच्या जागेच्या मालकाची भेट | पुढारी

भिडे वाडा स्मारकचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर? चंद्रकांत पाटलांनी घेतली थेट भिडे वाड्याच्या जागेच्या मालकाची भेट

पुणे, पुढारी ऑनलाईन: पुण्यातील भिडे वाड्याच्या स्मारकाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी आता पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या, अशी मागणी केली जात होती. ही मागणी मान्यदेखील झाली. मात्र स्मारकाच्या जागेचा प्रश्न सातत्त्याने समोर येत होता. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. पुण्यातील भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास मंत्री पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. तसेच बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, स्मारकासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन विजय ढेरे यांनी दिले.

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पुण्याचे पालकमंत्री पाटील हे आग्रही आहेत.यामहिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची देखील भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी महाधिवक्त्यांना भिडे वाड्यासंदर्भातील राज्य शासनाच्या भूमिकेसंदर्भात अवगत केले होते. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात महाराष्ट्र शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती.

यानंतर पाटील यांनी भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी मूळ जागा मालक असलेल्या विजय ढेरे यांच्यासमवेत पुण्यातील निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरातील भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तिथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्वाचे आहे. हे स्मारक फक्त राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बॅंकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला विजय ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बॅंकेचे सर्व सभासद आणि भाडेकरु यांच्याशी चर्चा करुन सहकार्याची भूमिका घेऊ असे सांगितले.

Back to top button