याची चर्चा तर होणारच… म्हणून राज ठाकरेंचा कार्यक्रम वसंत मोरेंना उभा राहून बघावा लागला! | पुढारी

याची चर्चा तर होणारच... म्हणून राज ठाकरेंचा कार्यक्रम वसंत मोरेंना उभा राहून बघावा लागला!

पुणे, पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पुणे दौरे वाढले आहेत. त्यातच राज ठाकरे यांचा एक कार्यक्रम चर्चेत असलेले मनसेचे नेते वसंत मोरे यांना सभागृहात उभे राहून बघावा लागला. यामुळे वसंत मोरेंना वारंवार डावलंय जातंय का?, अशी जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पुण्यात प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक पर्व या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृहात होता. या कार्यक्रमासाठी नियोजित कामे आटपून राज ठाकरे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पोहोचले. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या एका उपक्रमाचं नाट्यगृहाबाहेर उद्घाटन देखील केलं. अशोक पर्व या कार्यक्रमात राज ठाकरे हे वक्ते असल्याने मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. त्यासोबतच पुण्यातील नागरिक देखील अशोकपर्व कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हजर होते. यामुळे नाट्यगृह खचाखच भरले होते. अशोक सराफांचे चाहते आणि राज ठाकरेंचं भाषण ऐकायला आलेल्या लोकांना उभे राहूनच कार्यक्रम बघावा लागला. या सर्व लोकांमध्ये मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांना देखील कार्यक्रम उभा राहून बघावा लागला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कार्यक्रम असल्याने मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्या बरोबर अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. माजी नगरसेवक वसंत मोरे ज्या ठिकाणी उभे होते, त्याच ठिकाणी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसून होते. मात्र, त्यातील एकाही पदाधिकाऱ्याने वसंत मोरे यांना बसायला जागा दिली नसल्याची माहिती आहे.

पुणे शहरातील मनसेच्या अंतर्गत वादामुळे काही प्रमाणात दोन गट पडले आहेत. माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. यामुळे वसंत मोरे यांच्याबद्दल भूमिका पक्ष दोन दिवसात घेणार, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली होती. पक्षातून निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासोबत चारशे जणांनी मनसेला रामराम ठोकला होता. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यात मनसे नेत्यांची याबाबत तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला वसंत मोरे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं होतं. मात्र, अनेकवेळा पक्षाच्या कार्यक्रमात वसंत मोरे यांना डावलल्याचं बघायला मिळत आहे.

Back to top button