पुणे : फरार सराईताला बेड्या; जबरी चोरीचा छडा | पुढारी

पुणे : फरार सराईताला बेड्या; जबरी चोरीचा छडा

पुणे : एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. दरोडा, जबरी चोरी, वाहनचोरी अशा आठ गुन्ह्यांचा छडा लावून त्याच्या ताब्यातून चोरीच्या दुचाकी, मोबाईल, रोकड, गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राहुलसिंग रवींद्रसिंग भोंड (वय 18, रा. कॅनॉलशेजारी तुळजाभवानी वसाहत, हडपसर) असे त्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार कैफ मुनाजीर अन्सारी याला अटक केली असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. भोंड हा खडकी, हडपसर आणि भोसरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नितीन मुंडे यांना गुन्हा केलेला भोंड नावाचा सराईत गंगानगर कॉलनीजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक सुरेश जायभाये यांच्या पथकाने केली.

Back to top button