भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे माजी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने आज मंगळवारी सकाळी दुःखद निधन झाले आहे. जगताप यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. लक्ष्मण जगताप हे गेले तीन वर्ष कर्करोग आजाराशी झुंज देत होते.आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. शहराच्या राजकारणातील ढाण्या वाघ गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. आता जगताप यांच्यासारखा मोठा आधारस्तंभ निखळल्याने भाजपाला पोरकेपण आले आहे.

आमदार जगताप हे गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा पुण्यात आले. मात्र त्यांची तब्बेत अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द
१९८६ मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते. पुढे हवेली विधानसभेसाठी प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते, पण विलास लांडे यांना संधी मिळाली होती. नंतर विधान परिषदेसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकित अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता. राज्यात ती निवडणूक खूपच गाजली होती. २००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली होती.

नंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून त्यांनी अत्यंत कडवी झूंज दिली, पण तिथे श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून विजयी झाले. नंतरच्या काळात बदलती राजकिय समिकरणे लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभेतून आमदारकी केली. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमदार जगताप यांचे नाव मंत्री पदासाठी आघाडीवर होते. आता त्यांच्या निधनामुळे भाजपा पुढे नेतृत्वाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या निधनावर सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सांगवी येथील गणेश को-ऑपरेटिव्ह बँक, न्यू मिलेनियम स्कूल, प्रतिभा कॉलेज ऑफ सायन्स एन्ड कॉमर्स आदी संस्थांचे ते संस्थापक होते. पतंजली संस्था, हरिद्वारचे ते संस्थापक सदस्य होते. शहरातील अनेक संस्था, संघटनांचे ते आधारस्तंभ होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news