पुणे : भिडेवाडा पुन्हा बोलणार! मुख्यमंत्र्यांनी बैठक घेताच कामांना गती

पुणे : भिडेवाडा पुन्हा बोलणार! मुख्यमंत्र्यांनी बैठक घेताच कामांना गती
Published on
Updated on

सुवर्णा चव्हाण

पुणे : ज्या काळात महिलांना शिक्षणासाठी शाळाच नव्हत्या. बाहेर पडायचीदेखील सोय नव्हती, अशा वेळी समाजाचा विरोध पत्करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडेवाड्यात 175 वर्षांपूर्वी पहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या शाळेचे आता राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन बैठक घेऊन याबाबत निर्देश देताच प्रशासकीय पातळीवर या कामाला गती आली आहे.

3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिकादिन व महिला मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो. सन 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असे करण्यात आले. मात्र, ज्या भिडेवाड्यात त्यांनी पहिली शाळा सुरू केली ती इमारत पूर्ण मोडकळीस आली आहे. तेथे जाताना भीती वाटते इतकी भयंकर अवस्था आहे. याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा संस्था-संघटनांनी आंदोलन केले.

त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आठवडाभरापूर्वी प्रशासकीय पातळीवर बैठक घेतली, त्या वेळी जिल्हाधिकार्‍यांसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी पालिकेने या वाड्याच्या विस्ताराचा सुंदर आराखडा सादर केला, मात्र अनेक अडचणी सांगितल्या. यात या वाड्यात सात दुकाने आहेत. त्यांचा स्मारकाला विरोध नाही, मात्र त्यांना नूतनीकरण झाल्यावर तेथेच जागा पाहिजे, असेही सांगितले.

याबाबत न्यायालयातही प्रकरण गेले असल्याचे सांगितले. या समस्या ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनीही नुकतीच एक बैठक घेतली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सोमवारी बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतल्याने या कामाला गती आली असून, या शाळेचा लवकरच कायापालट होऊन ती नव्या स्वरूपात तयार होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news