

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या फेरीत 42 हजार 239 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, 23 हजार 351 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झाले. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 24 जूनपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. यंदा राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर 8 जूनपासून अकरावी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी 12 जूनची, तर दुसरा भाग भरण्यासाठी 15 जूनची मुदत देण्यात आली होती.
परंतु, दिलेल्या मुदतीत अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरता आला नाही. त्यामुळे पहिला भाग भरण्यासाठी 14 जून, तर दुसरा भाग भरण्यासाठी 17 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या निवड यादीची प्रतीक्षा होती. पहिल्या फेरीच्या निवड यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेचे 2 हजार 476, वाणिज्य शाखेचे 8 हजार 500, विज्ञान शाखेचे 11 हजार 953, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 422 विद्यार्थी आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या निवड यादीसह महाविद्यालयांचे पात्रता गुणही जाहीर केले.
त्यानुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस निर्माण झाली आहे. वाणिज्य शाखेसाठी 373 ते 466, कला शाखेसाठी 289 ते 468, विज्ञान शाखेसाठी 424 ते 473 पात्रता गुण आहेत. त्यात फग्युर्सन महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी 473 गुण, सिम्बायोसिस महाविद्यालयात कला शाखेसाठी 468 गुण, बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात 466 गुण प्रवेशासाठी आवश्यक आहेत. आतापर्यंत कोटाअंतर्गत प्रवेशांमध्ये 2 हजार 96 विद्यार्थ्यांनी इनहाऊस, 899 विद्यार्थ्यांनी अल्पसंख्याक आणि 54 विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्याअंतर्गत प्रवेश घेतला आहे.
यंदा दहावीचा निकाल थोडा कमी झाला. 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली. त्याचे प्रतिबिंब अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीच्या निवड यादीत दिसून येत आहे. पहिल्या फेरीचे पात्रता गुण गेल्या वर्षीच्या तुलनेत एक ते दीड टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
– डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय
हे ही वाचा :