पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी आज मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी भेट दिली. टिळक यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. विशेष म्हणजे तिथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येणार असल्याचं सोमय्या यांना समजल्यावर ते पवार यांची वाट पाहात थांबले. शरद पवार आल्यानंतर सोमय्या यांनी त्यांना अभिवादन केलं आणि दोघांनीही गिरीश बापट यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवारांसोबतच्या भेटीचा उल्लेख केला.
ते म्हणतात, ' शरद पवार यांच्याकडून राजकारणी म्हणून खूप शिकण्यासारख आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर आहे. यावेळी त्यांनी गिरीश बापटांना पुन्हा लवकरच संसदेत येण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.' एरवी राजकीय आखाड्यात एकमेकांविरोधात दंड थोपटून असलेले हे नेते एकत्र दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.