पुणे : पुलावरून पडून शेळगाव येथील मजूराचा मृत्यू | पुढारी

पुणे : पुलावरून पडून शेळगाव येथील मजूराचा मृत्यू

शेळगाव (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर तालुक्यातील शेळगाव तेलओढा येथील निरा डावा कालव्यावरील अनेक वर्षापासून धोकादायक झालेल्या पुलावरून पडून बबन भीमा चांदणे (वय ५०) या मजुराचा मंगळवारी (दि. २०) संध्याकाळी कालव्यात पडून मृत्यू झाला. या धोकादायक पुला संदर्भात दै. ‘पुढारी’ने मागील चार ते पाच वर्षात अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध केल्या, परंतु या पुलाची दुरुस्ती चार ते पाच वर्षात केली नाही. दुरूस्ती संदर्भात जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी हा पुल आमच्याकडे नाही म्हणून दुर्लक्ष केले आहे आणि अखेर धोकादायक पुलावरून पडून एक मजुराचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान या पुलाच्या दुरूस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेळगाव व तेलओढा येथील ग्रामस्थांनी महिलांनी केली आहे. घटनेचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक विजय टेळकींकर, पोलीस हवालदार मोहन ठोंबरे यांनी केला.

Back to top button