पुणे : शेंगा अळी नियंत्रणासाठी उपाय करा : कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे | पुढारी

पुणे : शेंगा अळी नियंत्रणासाठी उपाय करा : कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणार्‍या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शेतकर्‍यांनी या किडींवर वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन कृषि सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे. काही ठिकाणी अळीने तुरीवरी, फुले व शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे.

या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास 70 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकर्‍यांनी वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. शेतकर्‍यांनी पाने व फुलांची जाळी करणार्‍या अळीची प्रादुर्भावग्रस्त जाळी गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत. तसेच शेंगा पोखरणार्‍या अळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा.

तूर पिक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी दोन कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) पिकांच्यावर एक फूट उंचीवर लावावेत व निरीक्षण करावे. शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी उभारावेत. यामुळे पक्षांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.

पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क 5 टक्क्यांची किंवा अझेंडीरॅक्टिन 300 पीपीएम 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची 5 मिली 10 लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी.

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4.4 ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी 2 मिली किंवा क्लोरेनट्रीनीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 9.3 अधिक लॅमडा साहॅलोथ्रीन 4.6 झेडसी 4 मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मारुका किडीसाठी इंडोक्झाकार्ब 14.5 एससी 8 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीन पट वापरावी. शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही डॉ. मोटे यांनी पत्रकान्वये केले आहे.

Back to top button