शिर्सुफळ: शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शिर्सुफळ ते गोजूबावी रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी निविदा मंजूर होऊन ठेकेदाराला देण्यात आले तरी, अजूनही काम सुरू झालेले नाही. या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे.
या रस्त्याचे काम बर्याच वर्षांपासून निधीअभावी रखडले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे. मात्र, अधिकारी व ठेकेदार यांच्यामुळे वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. (Latest Pune News)
या रस्त्यासाठी जवळपास 75 लाख 49 हजार 738 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम ठेकेदारला मंजूर होऊनही अद्यापपर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे व मोठ्या प्रमाणावर खडी उखडली आहे.
पावसाळ्यामध्ये रस्ता चिखलमय होतो. शिर्सुफळ ते गोजूबावीकडे जाणार्या या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर अपघात वाढत चालले असून, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त निघत नसल्याने येथील नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
हा रस्ता पावसाळ्यामध्ये चिखलाने निसरडा होतो. शाळेतील विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वेताळ मंदिराकडे व बारामतीकडे जाण्यासाठी वर्दळ असल्याने त्यांनाही वाहतूक करताना अडचण निर्माण होते. मात्र, अधिकारी या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कित्येक वर्षे या रस्त्यासाठी निधी मिळत नव्हता. मात्र, आता निधी मिळूनही रस्त्याचे काम सुरू का होत नाही, असा सवाल वाहनचालक व नागरिकांनी केला. निविदा मंजूर होऊन 6 महिने झाले तरी बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उदयसिंह नांदखिले यांना वारंवार या कामासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी संपर्क करण्यास टाळाटाळ केली
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिर्सुफळ गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देत आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे अनेक कामे प्रलंबित राहात आहेत. या रस्त्याची आम्हाला अत्यंत गरज आहे. ठेकेदार व अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे गैरसोय होत आहे व वेताळ देवस्थानाकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. खडी उखडल्याने अनेक वेळा अपघात होत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता सुरू करून पूर्ण करावा.
-सचिन आटोळे, सामाजिक कार्यकर्ते, शिर्सूफळ