इंदापूर: पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांचा भाजपप्रवेश यामुळे निश्चित झाला आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल या वेळी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीवेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम करीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, त्या वेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. प्रवीण माने यांना अपक्ष विधानसभा लढवावी लागली. यामध्ये त्यांना 38 हजार मते पडली. तेव्हापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे संबंध वाढत गेले. (Latest Pune News)
शुक्रवारी (दि. 20) रात्री उशिरा पुणे येथील शासकीय विश्रामगृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माने यांनी भेट घेतली. या वेळी दौंडचे आमदार राहुल कुल, सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, बबन लावंड, अभिजित घोगरे, विजय घोगरे, महारुद्र पाटील, किसनराव जावळे इतर नेतेमंडळी उपस्थित होती.
इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाली असून, तालुक्याला आणखी जास्तीचा निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले.
माने यांच्यासह आमच्या विचाराच्या अनेकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला असून, मुंबई येथे पक्षप्रवेश होणार आहे. इंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी सांगितले. लवकरच या सर्वांच्या भाजपप्रवेशाची तारीख नक्की होणार आहे.
यापूर्वी 29 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या इंदापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी-नरसिंह देवाच्या दर्शनासाठी आल्यानंतर प्रवीण माने यांनी त्यांची भेट घेतली होती. 10 एप्रिल रोजी मुंबई येथील सागर बंगल्यावर तसेच फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देखील माने यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या होत्या.