पुणे: दहशतीसाठी गोळीबार करणारे चौघे जेरबंद, गेल्या दोन दिवसातील दुसरी घटना | पुढारी

पुणे: दहशतीसाठी गोळीबार करणारे चौघे जेरबंद, गेल्या दोन दिवसातील दुसरी घटना

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दहशतीसाठी गोळीबार करणार्‍या चौघांना विमानतळ पोलिसांनी सहा तासाच्या आत लोहगाव परिसरातून अटक केली. नितीन किसन सकट (वय.21), गणेश सखाराम राखपसरे (वय.21), पवन युवराज पैठणकर (वय.18,राहणार सर्व राखपसरे वस्ती लोहगाव), अविनाश काळुराम मदगे (वय.22,रा.खेसे वस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे.

कोरेगाव पार्कमध्ये दोन गटातील वादातून गोळीबाराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री लोहगावात दोन ठिकाणी गोळीबार करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारुच्या नशेत आपण भाई असल्याचे सांगत एका टोळक्याने हे कृत्य केले. याप्रकरणी, विमातळ पोलिसानी चौघांच्या विरुद्ध दहशत पसरवणे आणि आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस कर्मचारी प्रभाकर देवकाते (वय.32) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास तुकाराम महाराज मंदीर चौक व गणपती चौक लोहगाव परिसरात घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,चारही आरोपींनी शुक्रवारी रात्री मद्य प्रश्न केले होते. यानंतर आपणच परिसरातील भाई आहोत, आपला परिसरात वट पाहिजे, अशी त्यांची चर्चा झाली. यानंतर ते संत तुकाराम चौकात दुचाकीवरुन आले. तेथे नितीन सकट याने पिस्तूल बाहेर काढून हवेत दोन गोळ्या झाडल्या. तिथे उपस्थितांना धमकावत कोणी आमच्या वाट्याला गेले तर आम्ही एक एकाला गोळ्या घालू, कोणालाही जीवंत सोडणार नाही असा दम भरला. त्यानंतर ते दुचाकीवरुन गणपती चौकात गेले. तिथे सकटने पुन्हा एकदा हवेत गोळी झाडली आणि आरडा ओरडा करत नागरिकांना दमदाटी केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, पोलिस कर्मचारी योगेश थोपटे, गिरीष नानेकर व सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गोळीबार करणारे संशयित आरोपी लोहगाव परिसरात थांबले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश ढावरे कर्मचारी अविनाश शेवाळे, सचिन कदम, अंकुश जोगदंड, नाना कर्चे, रुपेश तोडेकर, यांच्या पथकाने छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केल्याची त्यांनी कबुली दिली. पुढील तपास एस.एस.कोळ्ळुरे करीत आहेत.

Back to top button