पुण्यात तीन अपघातांत तिघांचा मृत्यू | पुढारी

पुण्यात तीन अपघातांत तिघांचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातांत तिघांचा मृत्यू झाला.नगर रस्ता परिसरात लोणीकंद रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुर्गेश बबलू कोल (वय 19, सध्या रा. भावडी, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. कोल मूळचा मध्यप्रदेशातील आहे. तो मजुरी करत होता. भावडी ते लोणीकंद रस्त्यावरून तो निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक महादेव लिंगे यांनी या संदर्भात लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणीकंद परिसरातील केसनंद रस्त्यावर आणखी एक अपघात झाला. भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. टेक कालू टमट्टा (वय 27, रा. सुखवाणी सोसायटी, बालाजी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. टेक मूळचा नेपाळचा आहे. तो रखवालदार म्हणून काम करतो. दुचाकीस्वार टेक आणि त्याचा मित्र गणेश थापा केसनंद रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार टेकला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. सहप्रवासी गणेश याला दुखापत झाली. टेक याचा नातेवाईक टंक जमन बहाद्द्रर याने याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
मुंबई-पुणे रस्त्यावर पाटील इस्टेट परिसरात टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विशाल हरी वैराट (वय 29, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, मुंबई- पुणे रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक नवनाथ बबन मिसाळ (वय 25, रा. चिनके, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली. विशालचा भाऊ आकाश (वय 31) यांनी याबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार विशाल जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरून निघाला होता. गांधी वसाहतीसमोर भरघाव टेम्पोने दुचाकीस्वार विशालला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक वालकोळी तपास करत आहेत.

Back to top button