सोमेश्वरनगर : सोमेश्वरच्या अध्यक्ष- उपाध्यक्षांकडून मोटारी परत | पुढारी

सोमेश्वरनगर : सोमेश्वरच्या अध्यक्ष- उपाध्यक्षांकडून मोटारी परत

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी कारखान्याने दिलेली वाहने जमा केली. गेल्या आठ वर्षांपासून पुरुषोत्तम जगताप यांनी अध्यक्ष या नात्याने कारखान्याची चारचाकी विविध कामांसाठी वापरली. मात्र, काटकसरीचे धोरण अवलंबत जगताप व होळकर यांनी गाड्या परत केल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले. गुरुवारी (दि. 3) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जुने गेस्ट हाऊसही बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कारखान्याचे विस्तारीकरण झाल्याने कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. तसेच डिस्टलरी व सहवीज प्रकल्पाचे विस्तारीकरण होणार असल्याने काटकसर करण्यास संचालक मंडळाने आतापासूनच सुरुवात केली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी स्वतःपासूनच सुरवात करत तातडीने वाहन परत केले. यापुढे ते आता आपले खासगी वाहन वापरणार आहेत.

सोमेश्वर कारखान्यात आजपर्यंत सर्वाधिक वाहन खर्च विद्यमान उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांच्या कार्यकाळात झाला असल्याची चर्चा सभासदांत असली तरी याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी खंडन केले आहे. माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गीते यांनी कारखान्याचे वाहन वापरले नसल्याची नोंद आहे.

सन 2007 ते 2014 कार्यकाळात उपाध्यक्ष सुनील भगत यांच्यापासून उपाध्यक्षाला वाहन देण्यात आले. तेंव्हापासून आजपर्यंत सात उपाध्यक्षांनी कारखान्याचे वाहन वापरले आहे. दरम्यान, संचालक मंडळाच्या बैठकीत ऊसतोडीचे नियोजन, तसेच करार करूनही न आलेल्या वाहतूकदारांच्या पैशांबाबत काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

सोमेश्वर कारखाना नवीन प्रकल्प उभारत असल्याने खर्च व कर्ज वाढणार आहे. त्यामुळे आतापासूनच काटकसर करणे गरजेचे आहे. काटकसर आणि बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहने आणि गेस्ट हाऊस हे दोन खर्च संचालक मंडळाने कमी केले आहेत.
                                                  पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना

Back to top button