पुण्याजवळ रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी | पुढारी

पुण्याजवळ रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारणीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज ( दि. ३१ ) पत्रकार परिषदेत दिली.

रांजणगावचा क्लस्टर म्हणजे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक इको-सिस्टमच्या विस्ताराची सुरुवात आहे, असे सांगून राजीव चंद्रशेखर म्हणाले की, गत तीन वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील नव्या उद्योगांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते; पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला घराणेशाही आणि बेरोजगारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठे परिश्रम घेत आहेत. केंद्राच्या सहकार्याने राज्याच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

गेल्या काही काळात अनेक मोठे प्रकल्प गुजरातसह इतर राज्यांमध्ये गेले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे. त्यामुळे रांजणगावचा क्लस्टर म्हणजे राज्य सरकारला थोडाबहुत दिलासा मानला जात आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरणाअंतर्गत हा क्लस्टर उभारला जाईल. 297 एकर जागेवर क्लस्टर उभारला जाणार असून त्याच्या विकासासाठी 493 कोटी रुपये लागणार आहेत. यापैकी 208 कोटींची हिस्सेदारी केंद्र सरकारची असेल. क्लस्टरमुळे हजारो लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे.

वरील प्रकल्पाशिवाय ‘सीडॅक’ राज्यात गुंतवणूक करणार आहे. सीडॅक कडून सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे चंद्रशेखर यांनी नमूद केले. सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत हा प्रकल्प राज्यात राबवला जाणार आहे. सेमीकंडक्टर डिझाइन स्टार्टअप्समध्ये केंद्र सरकार थेट गुंतवणूक करीत असल्याची माहितीही चंद्रशेखर यांनी दिली.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button