Imran Khan : इम्रान खान यांच्या रॅलीत महिला पत्रकाराचा चिरडून मृत्यू (Video) | पुढारी

Imran Khan : इम्रान खान यांच्या रॅलीत महिला पत्रकाराचा चिरडून मृत्यू (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीत रविवारी हृदयद्रावक अपघात झाला. ‘हकीकी आझादी मार्च’ दरम्यान एका महिला टीव्ही पत्रकाराचा मृत्यू झाला. सदफ नईम असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. कंटेनरखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते आहे. या अपघातानंतर इम्रान खान यांनी मोर्चा थांबवण्याची घोषणा केली. नईम या चॅनल 5 न्यूज वाहिनीच्या पत्रकार होत्या.

पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खान (Imran Khan) यांची रॅली लाहोरमधील कामोके ते जीटी रोडकडे निघाली होती. यावेळी इम्रान हे एका कंटेनरवर होते. दरम्यान, पत्रकार सदफ नईम या आपल्या वाहिनीसाठी इम्रान यांची खास मुलाखत घेण्यासाठी आल्या होत्या. त्या इम्रान खान यांच्या कंटेनर सोबत धावत होत्या. याचवेळी त्या खाली पडल्या आणि कंटेनच्या चाकाखाली विरडल्या गेल्या. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेबाबत समजताच इम्रान खान यांनी तत्काळ कंटेनर थांबवण्यास सांगितला. ते स्वत: कंटेनरमधून खाली रस्तावर उतरले आणि या अपघाताची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदफ यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. ते म्हणाले, या दुःखद अपघातामुळे मोर्चा थांबवला जात आहे. तिसर्‍या दिवशीच हा मोर्चा गुजदरनवालाला पोहोचणार होता. मात्र, आता ते सोमवारी चौथ्या दिवशी गुजदरनवाला येथे पोहोचेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही या पत्रकाराच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. सदफ नईम या संवेदनशिल आणि मेहनती रिपोर्टर होत्या अशा भावना शरीफ यांनी व्यक्त केल्या आहेत.

इम्रान खान (Imran Khan) यांच्या कंटेनरला धडकल्याने पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. तसेच या घटनेचा कोणताही व्हिडिओ समोर आलेला नाही. दुनिया टीव्हीच्या बातमीनुसार, सदफ या त्यांच्या टीव्ही चॅनलसाठी खान यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत होत्या. माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनीही सदफ यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून खान यांच्या कंटेनरने चिरडून पत्रकाराचा मृत्यू कसा झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Back to top button