

पुणे : पुढारी वृत्तसेवा
उन्हाची तीव्रता वाढत असून, परिणामी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत आहेत. सध्या जिल्ह्यातील 36 गावे आणि 253 वाड्यांना 49 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
ग्रामीण भागात सर्वाधिक पाणीटंचाई आंबेगाव तालुक्यात जाणवत आहे. जिल्ह्यातील 103 गावांतील नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवावी लागते. या गावांतील पाणीटंचाई कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी विकास आराखडा तयार केला गेला आहे.
आंबेगाव तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई असून, 16 टँकरद्वारे 12 गावे आणि 84 वाड्यांतील 76 हजार 661 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खेड तालुक्यातील अकरा गावे आणि 101 वाड्यांतील 21 हजार 440 नागरिकांना सात टँकरने पाणी पुरविले जात आहे.
शिरूर तालुक्यातील सहा गावे, 25 वाड्यांतील 19 हजार 500 नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या ठिकाणी 14 टँकर सुरू आहेत. जुन्नरमधील सहा गावे आणि 28 वाड्यांतील सहा हजार 50 जणांना 9 टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. पुरंदर, बारामती आणि भोर तालुक्यात प्रत्येकी एक टँकर सुरू असून, अनुक्रमे 2450, एक हजार आणि 267 नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील 36 गावे आणि 253 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी 37 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये आंबेगाव 15, खेड आणि जुन्नर प्रत्येकी 7, शिरूर 6, भोर आणि पुरंदर तालुक्यात प्रत्येकी एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.